शिव ठाकरे आणि वीणा जगताप
मुंबई, 08 डिसेंबर : बिग बॉस मराठी 2 च्या घरातील लव्ह बर्ड्स अर्थात शिव ठाकरे आणि वीणा जगताप . घरात दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगली. दोघांनी एकमेकांबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं. घराबाहेर गेल्यानंतरही दोघांचं प्रेम कायम होतं. दोघांनी एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत नात्याची कबूली दिली होती. बिग बॉसच्या घरात तयार झालेलं शिव आणि वीणाचं नातं मात्र काही दिवसात संपुष्टात आल्याचं समोर आलं होतं. वीणानं शिवच्या नावाचा काढलेला टॅटू तिनं पुसला आणि सोशल मीडियावरील दोघांचे फोटो डिलीट केल्यानं दोघांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं. मात्र अखेर 2 वर्षांनी खरं प्रेम प्रेक्षकांसमोर आलं आहे. वीणानं स्वत: शिव वरचं प्रेम व्यक्त केलं. त्यानंतर आता शिवने सुद्धा दोघांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस 16 मध्ये खेळत आहे. मराठमोळा शिव ठाकरे हिंदी बिग बॉसमध्ये जाऊनही तितक्याच ताकदीनं खेळत आहे. तिथंही त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवचं बिग बॉस 16 चा विजेता ठरणार यावर शिक्का मोर्तब झालेला असताना अचानक घरात शिव ठाकरे ठसाठसा रडला. घरात सुरू असलेल्या वादावादीमुळे तो स्वत:ला फार एकट समजत होता. मात्र त्याच्या या एकटेपणात वीणा त्याच्यासाठी धावून आली. आता नुकतंच शिव सुद्धा वीणाविषयी बोलला आहे. हेही वाचा - Mira Jagannath : बिग बॉस मधून बाहेर पडताच मीरा जगन्नाथने स्वतःसाठी खरेदी केली ‘ही’ गोष्ट; सोशल मीडियावर एकच चर्चा बिग बॉस 16 च्या 7 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये, शिव ठाकरेने बिग बॉस मराठीत त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबद्दल पहिल्यांदाच बोललाय. या एपिसोडमध्ये शिवने उघड केलं की त्यांचं ब्रेकअप होऊन आता सात महिने झाले आहेत, पण अजूनही ते मूव्ह ऑन करू शकलेले नाहीत.
साजिद खान आणि टीना दत्ता यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान शिव ठाकरे यांनी ‘बीबी मराठी’च्या घरात वीणा जगतापच्या प्रेमात पडल्याबद्दल सांगितले आणि तो म्हणाला, ‘‘7 महिन्यांपूर्वी आमचे ब्रेकअप झाले होते, परंतु आम्ही अजूनही त्यातून बाहेर आलेलो नाही. ती कामात व्यस्त झाली. रिअॅलिटी शोमध्ये मी पुन्हा कधीही प्रेमात पडणार नाही असे वचन दिले. बीबी मराठीमध्ये आम्ही एकमेकांसाठी केलेल्या रोमँटिक गोष्टी केल्या. पण अजूनही आम्ही एकमेकांना विसरू शकत नाही.’’ अलीकडेच शिव आणि बिग बॉस यांच्यातील ही व्हिडीओ क्लिप वीणानं शेअर करत अखेर तिच्या मनातील प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं होतं. वीणानं शिवचा व्हिडीओ शेअर करत त्याला धीर दिला होता. ‘वाघ आहेस तू, हग्स. रडू नाही अजिबात मी आहे सोबत नेहमी’,असं म्हणत वीणानं शिवसाठी प्रेम व्यक्त करत खूप सारे हार्ट इमोजी देखील शेअर केले होते. आता हे दोघे सगळे गैरसमज विसरत पुन्हा एकत्र येणार का याकडे चाहत्यांचा लक्ष लागलं आहे.