मुंबई 6 मे**:** आसावरी जोशी (Asawari Joshi) या मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी मराठीसोबतच हिंदीसृष्टीतही आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती पंकज कपूर (Pankaj Kapur) यांच्या ऑफिस ऑफिस (Office Office) या मालिकेमुळं. परंतु या मालिकेत काम करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. प्रसिद्ध अभिनेता संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांनी अजब गजब प्रँक करुन त्यांना अक्षरश: हैराण करुन सोडलं होतं. एकदा तर त्यांनी खुर्चीखाली उंदीर सोडला होता. पाहूया काय होता तो गंमतीशीर किस्सा… आसावरी जोशी यांनी अलिकडेच दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी संजय मिश्रांचा हा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “संजय मिश्रा हे अत्यंत खोडकर स्वभावाचे आहेत. वरकरणी ते खुप शांत किंवा संयमी वगैरे वाटतात. परंतु खरं तर ते लहान मुलांसारखे खट्याळ आहेत. ऑफिस ऑफिस या मालिकेत त्यांच्यासोबत माझी खुप चांगली मैत्री झाली. पण ते मला भयंकर त्रास द्यायचे. माझ्यासोबत सतत प्रँक खेळायचे. मला उंदरांची फार भीती वाटते हे त्यांना माहित होतं. त्यामुळं त्यांनी मला घाबरवण्यासाठी शूटिंग सुरु असतानाच माझ्या खुर्चीखाली उंदीर सोडला होता. अन् स्वत:च जोरजोरात ओरडू लागले. त्यानंतर सेटवर जी पळापळ झाली ती आठवून आजही असू आवरत नाही. या प्रसंगामुळं पंकज कपूर त्यांच्यावर नाराज झाले होते. पण हे कसले ऐकतात पुढचा प्रँक त्यांनी त्यांच्यासोबत केला. अर्थात त्यांच्या याच स्वभावामुळं सेटवरील सर्वांमध्ये एक छान मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. अन् त्यामुळंच ऑफिस ऑफिस ही मालिका इतकी लोकप्रिय झाली.” ‘सामान्य मुलीला केलं सुपरस्टार’; आसावरी जोशींनी मानले पंकज कपूर यांचे आभार ‘ऑफिस ऑफिस’ ही मालिका 2001-04 या दरम्यान सुरु होती. या विनोदी मालिकेत आसावरी यांनी उशा ही व्यक्तिरेखा साकारली होती. अन् ही व्यक्तिरेखा त्याकाळी तुफान गाजली. पंकज कपूर यांच्या या मालिकेमुळंच आसावरी जोशी हे नाव घराघरात पोहोचलं असं त्या म्हणाल्या. पुढे या मालिकेतून मिळालेल्या अफाट लोकप्रियतेच्या जोरावर त्यांना अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अगदी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. अन् या मिळालेल्या यशाचं मोठं श्रेय त्या पंकज कपूर यांना देतात.