मुंबई 04 ऑगस्ट: सब टीव्हीवरील लाडकी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेला गेले अनेक दिवस बरेच धक्के बसताना दिसत आहेत. मालिकेतील अनेक महत्त्वाचे कलाकार मालिका सोडून जाताना दिसत आहेत. आता या यादीमध्ये अजून एका कलाकाराचं नाव जोडलं जाण्याची शक्यता दिसत आहे. मालिकेतून टप्पूचं पात्र साकारणाऱ्या राज अनादकटने सुद्धा मालिका सोडायचा निर्णय घेतला असल्याचं समोर येत आहे. टप्पू सोडणार का मालिका? मालिकेत जेठालालचा मुलगा टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट गेले अनेक दिवस मालिकेत दिसून आलेला नाही. तसंच मालिकेला नुकतीच चौदा वर्ष पूर्ण झाली याबद्दल केलेल्या सेलिब्रेशनमध्ये सुद्धा राजची अनुपस्थिती दिसून आल्याने आता राज सुद्धा मालिका सोडणार का अशा चर्चा जोर धरताना दिसत आहेत. यावर राजने स्वतः प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलं आहे. राजने नुकतंच पिंकविलाशी बोलताना सांगितलं, “जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी माझ्या चाहत्यांना नक्कीच माहिती देईन. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांनाच माहिती मिळेल.” गेली चौदा वर्ष तारक मेहता ही मालिका प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करत आली आहे. टीआरपी ते अगदी चाहत्यांचं असलेलं प्रेम सगळ्याच बाबतीत मालिका अग्रेसर राहिली आहे. मागच्या काळात मालिकेतून अनेक महत्त्वाच्या पात्रांनी एक्झिट घेतल्याचं दिसून आलं आहे. हे ही वाचा- Mithilesh Chaturvedi: ‘कोई मिल गया’ फेम अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन दयाबेनचं पात्र गेले अनेकवर्ष मालिकेतून गायब आहे. दयाला परत आणायचे अनेक प्रयत्न झाले पण दिशा वकानी शो मध्ये परत यायची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीये. तसंच तारक मेहता हे महत्त्वाचं पात्र साकारणाऱ्या शैलेश लोढा या अभिनेत्याने सुद्धा मालिकेला रामराम ठोकला होता. त्याच्या एक्झिटने चाहते बरेच दुखी झाले होते. अंजली, सोनी यांनीहि मालिका बऱ्याच दिवसांपूर्वी सोडली आहे.
मालिकेचा टीआरपी जबरदस्त असला तरी मालिकेतून एक एक कलाकार सोडून जात असल्याने सध्या चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. टप्पूचं पात्र मालिकेत दोनदा रिप्लेस करण्यात आलं आहे. सुरुवातीपासून भव्य गांधी हा टप्पू साकारत होता त्यानंतर राजने त्याच्या जागी मालिकेत एंट्री घेतली होती.