मुंबई 16 जून: मराठी आणि बॉलिवूड अशा दुहेरी फ्रंटवर आपापली लक्षणीय कामगिरी दाखवणारा एक ख्यातनाम दिग्दर्शक निशिकांत कामत (nishikant kamat )यांनी दोन वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी फारच लवकर एक्झिट घेतल्याची प्रतिक्रिया बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतून सुद्धा आजही व्यक्त केली जाते. मराठीतील अनेक दिग्दर्शकांचे मेंटॉर असणाऱ्या निशिकांत कामत( nishikant kamat birth anniversary ) यांची 17 जून ही जन्मतिथी असून त्यांच्याविषयीच्या काही आठवणींना उजाळा देऊया. निशिकांत कामत हे मूळचे मुंबईचे असून त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. अनेक मालिका, चित्रपटांमध्ये कॅमेरा, लेखन, दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका त्यांनी सांभाळली आहे. त्यांनी ‘डोंबिवली फास्ट’ या अत्यंत संवेदनशील विषयांवरच्या चित्रपटातून पदार्पण केलं. या फिल्मचं अनेक स्तरांवर खूप कौतुक करण्यात आलं होतं. मराठीतील एक नावाजलेला चित्रपट म्हणून ‘डोंबिवली फास्ट’ कडे पाहिलं जातं. आपल्या डेब्यूमधूनच एक खणखणीत फिल्म दिल्याने या दिग्दर्शकाकडे प्रेक्षक वेगळ्या नजरेने पाहत होते. या फिल्मचा तामिळ भाषेत रिमेक करण्यात आला ज्यात आर.माधवनने अप्रतिम भूमिका केली आहे. निशिकांत यांनी बॉलिवूडमध्ये ‘मुंबई मेरी जान’ ’ या चित्रपटासह दमदार एंट्री केली. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून त्यांना काहीतरी समजाबद्दल अत्यंत गांभीर्याने सांगायचं आहे हे प्रकर्षाने जाणवत असे. पण हा दिग्दर्शक यशाच्या शिखरावर असताना कायम कुठेतरी गायब व्हायचा. मोजके पण दर्जेदार चित्रपट करायची निशिकांत यांची खासियत होती. पण यामुळे अनेकांना त्यांच्या कमी कलाकृती पाहायला मिळाल्या असं त्यांचं मत आहे. याबद्दल त्यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या झी मराठीवरील मुलाखतीच्या कार्यक्रमात प्रकाश टाकत असं सांगितलं होतं की, “फार प्रामाणिकपणे सांगायचं तर मुंबई मेरी जान च्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही बराच वेळ काम करत होतो जवळपास 73 दिवस मुंबईत शूटिंग केलं, मुंबईभर फिरलो त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून मला जाणवलं की मी खूप drain झालो. माझी सगळी एनर्जी मी चित्रपटाला दिली. त्या अख्ख्या प्रोसेसनंतर मला असं वाटलं की आपण थोडं थांबूया. असे भरीसभर चित्रपट करण्यात मला रस नाही. प्रत्येक चित्रपट तुम्ही सर्वस्व पणाला लावलं असेल तर खूप थकायला होतं. मग मी ठरवलं की एक-एक वर्षाचा ब्रेक घेऊ आणि आपलं रुटीन रिसेट करू. त्यामुळे मी एक चित्रपट करतो आणि एक-डिड वर्ष अराम करून शांत होऊन पुढच्या कलाकृतीवर काम करतो.”
या दिग्दर्शकाने लई भारी, रॉकी हँडसम, मदारी असे दर्जेदार चित्रपट केले आहेत. त्याच्या अत्यंत गाजलेल्या ‘दृश्यम’ या थरारपटासाठी त्याचं आजही कौतूक केलं जातं. एक हिट चित्रपट दिल्यावर जिथे कलाकार त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक होते, बॉलिवूडला निशिकांत कामतच्या रूपात एक भक्कम दिग्दर्शक मिळाला होता, अनेक ऑफर्स येत होत्या अशा काळातसुद्धा त्याने सगळं सोडून अमेरिकेत शिकायला जायचा निर्णय घेतला. यावरून एक फिल्ममेकर म्हणून कायमच स्वतःमध्ये सुधारणा करणं आणि शिकत राहणं किती गरजेचं आहे हे त्याने दाखवून दिलं. हे ही वाचा- आमिर खानची Lagaan फिल्म Brodway Show मध्ये रूपांतरित होणार? आज मराठीमधील अनेक कलावंत निशिकांतला आपला मित्र, मेंटॉर सगळंच मानतात. अभिनेता जितेंद्र जोशी, दिग्दर्शक संजय जाधव यांनी वारंवार निशिकांतबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे. मराठीमध्ये लवकरच येणारा निखिल महाजन दिग्दर्शित ‘‘गोदावरी’ हा चित्रपट निशिकांत कामात याना समर्पित करण्यात आला आहे. याबद्दल स्वतः जितेंद्र जोशी वारंवार अनेक ठिकाणी बोलताना दिसले आहेत.
मराठी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये सुद्धा भरविव कामगिरी केलेल्या या दिग्दर्शकाची अकाली एक्झिट मात्र सिनेसृतील चटका लावून गेली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी निशिकांत कामत यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना कावीळ झाली होती आणि क्रोनिक लिव्हरच्या आजारानं ते त्रस्त होते. एक खूप भावपूर्ण, संवेदनशील आणि मोठा दिग्दर्शक गमावल्याची हळहळ आजही चाहत्यांकडून व्यक्त केली जाते.