मुंबई, 18 ऑगस्ट: जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीनं (Coronavirus Pandemic) आपल्या देशातही (India) गेली दीड वर्षात लाखो लोकांचा बळी घेतला आहे, तर कोट्यवधी लोकांना याची लागण झाली आहे. अजूनही ही दररोज हजारो लोकांना या आजाराची लागण होत आहे. आता यावर प्रतिबंधात्मक लस (Vaccine) उपलब्ध झाल्यानं धोका काहीसा कमी झाला आहे. केंद्र सरकारनं जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मात्र आपल्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात लसीकरण करण्याचा खर्चही मोठा आहे. त्यामुळं लसीकरणासाठीही आर्थिक मदतीची गरज आहे. तसंच कोरोनाची साथ संपलेली नसल्यानं गरीब लोकांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी न्यू इंग्लंडमध्ये (New England) एक फाउंडेशन चालवणाऱ्या अनुराधा जुजू पालकुर्थी (Anuradha Juju Palakurthi) यांनी कोविड फंडाला मदत करण्यासाठी ‘Vax.India.Now’ ही ऑनलाईन माध्यमातून फंड उभी करणारी मोहीम सुरू केली. त्याद्वारे त्यांनी एका महिन्यापूर्वी एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकारांचा सहभाग असलेल्या एका व्हर्च्युअल सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यात ए. आर. रहमान (AR Rahman) , स्टिंग (Sting), लियाम नीसन (Liam Neeson), अॅनी लेनॉक्स (Annie Lennox), पिया टोस्कानो, झुबिन मेहतासारखे ख्यातनाम कलाकार सहभागी झाले होते. 7 जुलै रोजी CNN आणि Dreamstage.live द्वारे हा कार्यक्रम जगभरात थेट प्रसारित करण्यात आला. याचे सूत्रसंचालन हसन मिन्हाज यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला जगभरातील रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि यातून कोट्यवधी रुपये उभारण्यात आले. ही सगळी रक्कम इंडिया कोविड रिलिफ फंडाला (India Covid Relief Fund) देण्यात आली. (हे वाचा: सोनम कपूरच्या बहिणीला पळून जाऊन करायचं होतं लग्न; स्वतः केला खुलासा ) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात दररोज लाखो लोकांना लागण होत होती. दिवसाला 4 लाख लोक बाधित होत होते. यामुळे मृत्यूचे प्रमाणही अधिक होते. या अवस्थेमुळे हादरलेल्या अनुराधा पालकुर्थी यांनी आपल्या देशातील नागरिकांचे जीव वाचावाण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आणि मोठा निधी उभारण्यासाठी आपल्या मित्र परिवाराच्या सहकार्यानं Vax.India.Now मोहिम सुरू केली. या अंतर्गत जागतिक स्तरावरील कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केलं. त्याला जगभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. याबद्दल त्यांनी देणगीदारांचे आभार मानले असून, ही मोहीम अजूनही ‘VaxindiaNow.com’ वर चालू असून, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण कार्यक्रम वेगानं राबवणे गरजेचे आहे, यामुळे कोविड-19चा प्रसार रोखता येईल, असं आवाहन त्यांनी केली आहे. (हे वाचा: लग्नानंतर अभिनेत्री यामी गौतमनं बदललं आपलं नाव; हे आहे नवं नाव ) जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3.2 कोटी लोकांना या आजाराची बाधा झाली असून, आतापर्यंत 4 लाख 28 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 47 कोटी 9 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. सध्या संसर्गाचा दर दररोज 35 हजारांवर आला असला तरी या साथीतून सुटका होण्यासाठी लसीकरण होणं अत्यावश्यक आहे.