मुंबई, 26 जुलै : लवकरच बिग बॉस मराठीचा चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत बिग बॉस मराठीची धुरा महेश मांजरेकर सांभाळत होते. पण चौथा सिझन ते होस्ट करणार नाही आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या सिझनचा होस्ट कोण असणार याची उत्सुकता वाढली आहे. अशात एक नाव समोर आलं आहे. बिग बॉस मराठी शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट फक्त तीन सिझनपर्यंत असल्याचं सांगितलं. त्यामुळे चौथा सिझन कोण होस्ट करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला. नवीन माहितीनुसार अभिनेता सिद्धार्थ जाधव बिग बॉस मराठी सिझन 4 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असल्याची शक्यता आहे. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या विविध भूमिका साकारत आहे. तो मराठीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटांमधून सुद्धा सिद्धार्थ जाधव महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसतो. पण आता तो एका नव्याकोऱ्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठीमध्ये सिद्धार्थ कार्यक्रमाचा निवेदक म्हणून दिसू शकतो.
बिग बॉस मराठी सिझन 4 चे सूत्रसंचालन करण्यासाठी सिद्धार्थचे नाव सर्वच जण घेत होते. त्यामुळे आता या सिझनचे सूत्रसंचालन सिद्धार्थ करणार असल्याचे सांगितले जात आहे. पण सिद्धार्थ कडून याविषयी कुठलाही शिक्कामोर्तब झालेला नाही. हेही वाचा - Swapnil Joshi : ‘आई-वडीलांची साथ असणं हिच खरी संपत्ती’ स्वप्नील जोशीचा जुना व्हिडीओ चर्चेत ‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील एक वादग्रस्त कार्यक्रम मानला जातो. पण तो तितकाच लोकप्रियही ठरतो. ‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच गाजले होते. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात कोण सहभागी होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकरच दे धक्का 2 या मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या हिंदी चित्रपटात देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या चाहत्यांना त्याला या नव्या भूमिकेत बघण्याची उत्सुकता आहे.