शिव ठाकरे
मुंबई, 15 फेब्रुवारी : ‘बिग बॉस 16’ संपला असला तरी त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावेळी पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. तर मराठमोळा शिव ठाकरे या सीझनचा उपविजेता ठरला. शो संपल्यानंतर अलीकडेच सर्व स्पर्धक पार्टी करताना दिसले. फराह खानने तिच्या घरी सर्व स्पर्धकांसाठी एक भव्य पार्टी दिली. त्यात शिव ठाकरे, निमृत कौर अहलुवालिया आणि प्रियंका चहर चौधरीही सामील झाले होते. या सगळ्यानंतर शिव ठाकरे त्याच्या गावी म्हणजेच अमरावतीला पोहोचला आहे. शिव बिग बॉस नंतर अमरावतीला आला तेव्हा जे घडलं त्याची सगळीकडेच चर्चा होत आह. शिव ठाकरे ‘बिग बॉस 16’ चा उपविजेता ठरला. या शोची ट्रॉफी जरी तो जिंकू शकला नसला तरी त्याने लोकांची मने जिंकली. ‘बिग बॉस 16’ च्या फिनालेमध्ये शिवची एमसी स्टॅन आणि प्रियांका चहर चौधरी यांच्याशी चुरशीची लढत झाली. जेव्हा प्रियंका टॉप 2 मधून बाहेर पडली तेव्हा सर्वांना शिव ठाकरेच विजयी होईल असं वाटत होतं. पण एमसी स्टॅन जिंकला. आता ‘बिग बॉस 16’ची ट्रॉफी एमसी स्टॅनकडे असली तरी लोकांसाठी मात्र शिव ठाकरेच विजेता आहे याचा प्रत्यय नुकताच आला आहे. शिव ठाकरे बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यानंतर अमरावतीत पोहचला तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली. एवढाच नाही ते ढोल ताशांच्या गजरात त्याच जंगी स्वागत करण्यात आलं. हेही वाचा - Valentine Day 2023: ऐन व्हॅलेंटाईन डे दिवशी एकटी पडली राखी; आदिलआधी ‘या’ व्यक्तींच्या होती प्रेमात शिव ठाकरे अमरावती येथील त्याच्या घरी पोहोचताच लोकांनी रस्ता अडवला आणि फटाके वाजवून ढोलताशांच्या तालावर नाचू लागले. सर्वजण शिव ठाकरेच्या नावाच्याच घोषणा देत होते. एवढं प्रेम पाहून शिव ठाकरेना प्रचंड आनंद झाला आणि त्याने सगळ्यांचे हात जोडून आभार मानले. शिवच्या स्वागताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिव ठाकरेला ‘बिग बॉस 16’ मधील सर्वात मजबूत खेळाडू म्हटले जात होते. घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सेलिब्रेटीने शिवाच्या खेळ खेळण्याच्या रणनीतीची प्रशंसा केली. सलमाननेही अनेकवेळा शिवाचे कौतुक केले. ‘बिग बॉस 16’ च्या आफ्टर पार्टीमध्ये सलमान खानने शिव ठाकरेसोबत फक्त चर्चाच केली नाही तर काही आगामी मराठी प्रोजेक्ट्सबद्दलही सांगितलं. शिव ठाकरेचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. एक सामान्य माणूस बिग बॉसमध्ये जाऊन लोकांची मने जिंकेल, असा विचारही कुणी केला नव्हता. शिव ठाकरे सुरुवातीला वडिलांसोबत पानाच्या दुकानात काम करायचा. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो वर्तमानपत्रे आणि दूधही विकायचा. इतकंच नाही तर संगीत आणि इतर कार्यक्रमांसाठी शिव ठाकरे कोरिओग्राफी सुद्धा करायचा. यातून घरची कमाई व्हायची. शिव ठाकरे नृत्य शिकवून 20 ते 22 हजार रुपये कमावायचा.
पण ‘रोडीज’मध्ये आल्यानंतर शिव ठाकरेंचं आयुष्यच बदललं. पुढे त्याने ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सीझन जिंकून सर्वांना आपला फॅन बनवलं. आता जेव्हा शिव ठाकरे ‘बिग बॉस 16’ मध्ये आला तेव्हा त्याचे महाराष्ट्रातचं नाही तर देशभरात चाहते झाले आहेत. आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये जाण्याचे शिव ठाकरेचे स्वप्न आहे. शिवला रोहित शेट्टीने ‘खतरों के खिलाडी 13’साठी साइन केल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे याला दुजोरा मिळालेला नाही.