आई कुठे काय करते
मुंबई, 30 जानेवारी : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. सध्या मालिका फारच उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सध्या अनघाच्या बाळाच्या बारश्याची लगबग पाहायला मिळत आहे. अनघा आणि अभिच्या मुलीच्या छकुलीच्या बारश्याला देशमुख कुटुंब एकत्र येणार आहे. अरुंधतीने छकुलीचं नाव ‘जानकी’ असं ठेवलं आहे. पण याच मुहूर्तावर मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची बोलणी होणार आहे. मात्र आता मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. आई कुठे काय करते मालिकेचा एपिसोड अपडेट समोर आलाय. त्यानुसार देशमुखांच्या घरात छकुलीचा बारश्याच्या उत्साह पाहायला मिळतोय. सगळे कुटुंबीय एकत्र आले आहेत. अगदी आशुतोष आणि त्याची आई सुद्धा बारशाला उपस्थित आहेत. आता अशातच घरात अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचा विषय निघणार आहे. त्यात मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. हेही वाचा - Hemangi Kavi: ‘धर्मामुळे त्याचा द्वेष करणारे….’ बॉलिवूडच्या ‘पठाण’ बद्दल हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत नव्या अपडेटनुसार, अप्पा सगळ्यांसमोरचा आशुतोषला विचारतात, ‘तुम्ही अरुंधतीशी लग्न करायला तयार आहात का?’ यावर आशुतोष लगेच त्याचा होकार कळवतो. हे ऐकून घराच्या सगळ्यांनाच धक्का बसतो. पण कांचन रागात अप्पाना पुढे येत मनात, ‘काय बोलताय तुम्ही? या वयात लग्न करणं हा शुद्ध वेडेपणा आहे.’ तिचं हे बोलणं ऐकून अप्पा चिडतात. आणि कांचनला उत्तर द्यायला जाणार तेवढ्यात चक्कर येऊन खाली कोसळतात. अप्पाना कोसळलेलं पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. अरुंधती जिवाच्या आकांताने अप्पाना हाक मारते.
आता मालिकेत अरुंधतीच्या पुढ्यात पुन्हा नवं आव्हान उभं राहणार आहे. आता अप्पाना नेमकं काय झालं, देशमुख कुटुंबीय यातून कसे सावरणार, अप्पा लवकर बरे होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिका टीआरपीच्या शर्यतीत सतत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असते. ही मालिका आई अर्थातच अरुंधती या पात्राभोवती फिरणारी आहे. मालिकेच्या सुरुवातीलाही वेगळा आशय असणारी कथा प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. त्यामुळे अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली होती. मात्र आता या मालिकेला प्रेक्षक कंटाळले की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मालिकेत सुरु असलेला ट्रॅक काही प्रेक्षकांना रुचत नसल्याचं दिसून येत आहे. एका युजरने कमेंट करत ‘आईच्या नावाने सुरु झालेल्या मालिकेत इतकी प्रेम प्रकरणे दाखवत आहात. आई आजी झाल्यानंतर तिचं लग्न दाखवत आहात. आता ही मालिका तुम्ही बंद करुन टाका’. असा संताप या नेटकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे मालिकेत घडणाऱ्या आगामी कथानकाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं देखील महत्वाचं आहे.