आई कुठे काय करते
मुंबई, 31 डिसेंबर : ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या कथानकात येणाऱ्या ट्विस्टमुळे दिवसेंदिवस मालिका रंजक होत आहे. एकीकडे देशमुख कुटुंबात नव्या पाहुणीच आगमन तर दुसरीकडे अभि आणि अनघात येणाऱ्या दुराव्यामुळे मालिकेला वेगळं वळण लागलं आहे. त्याचसोबत एकीकडे अनिरुद्ध आणि संजनाचं नातं तुटत असताना दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष मध्ये जवळीक वाढत आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे नेमकं काय घडणार ही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. पण आता मालिकेत वेगळाच ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या पुढच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये आशुतोष आणि अनुष्का डेटवर गेलेले दिसत आहेत. आशुतोष तिला ‘तू एवढ्या वर्षांनी का परत आली आहेस? मला खरं खरं सांग’ असं म्हणतो. त्याला उत्तर देत अनुष्का आशुतोषवरील प्रेमाची कबुली देते. ती म्हणते, मी तुझ्यासाठी इथे आलीये. मला आवडतोस तू.’ हे ऐकून आशुतोषला आश्चर्याचा धक्का बसतो. हेही वाचा - Shreyas Talpade Wife: पहिल्याच भेटीत कॉलेज सेक्रेटरीच्या प्रेमात पडला श्रेयस; फारच फिल्मी आहे दोघांची लव्हस्टोरी आशुतोष यावर अनुष्काला म्हणतो कि, ‘तू मला खरं आणि मनापासून उत्तर दिलंस त्याबद्दल खूप थँक्यू. अनुष्का तू मला आवडतेस.’ आशुतोषचं अरुंधतीवर प्रेम असताना तो अनुष्काला असं का म्हणला हे येणाऱ्या भागात समोर येईल. पण या ट्विस्टमुळे मालिकेला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती आशुतोषला आपल्या मनातील भावना सांगणार होती. अरुंधती आपलं आयुष्य आशुतोष सोबत काढण्याच्या विचारात असताना त्याच्या आयुष्यात मात्र अनुष्काची एंट्री झाली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीसा दुरावा आला होता. त्यानंतर आशुतोष ने अरुंधतीला त्याच्या प्रेमाची पुन्हा एकदा जाणीव करून दिली होती. आता मात्र अनुष्काने आशुतोषवरील प्रेमाची कबुली दिल्याने मालिका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे.
अनुष्का ही आशुतोषची खूप जुनी मैत्रीण आहे. ते दोघे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. आता बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठे अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आता येणाऱ्या भागात नक्की काय घडणार, अनुष्का अरुंधतीच्या आयुष्यात व्हिलन ठरणार का की आशुतोष पुन्हा अरुंधतीसोबत जाणार हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.