त्यांनी असा टोकाचा निर्णय घेण्याऐवजी आमच्याकडे यायला हवं होतं, असं पोलिसांनी म्हटलं.
शहजाद राव, प्रतिनिधी बागपत, 25 जुलै : तुम्ही सोशल मीडियाच्या अधीन असाल, तर जरा सांभाळून. कारण सोशल मीडियावरील घोटाळे प्रचंड वाढले आहेत. लोक वाईट मार्गाने पैसे कमवू लागले आहेत. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातून यासंदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फोनवर अज्ञात क्रमांकावरून आलेला अश्लील व्हिडिओ कॉल उचलल्याने स्क्रीन रेकॉर्डिंग करून एका 65 वर्षीय व्यक्तीला पैशांसाठी वारंवार धमकावलं. त्याच्याकडून 3.31 लाख रुपये लुबाडले. मात्र पैशांची ही मागणी पुढे वाढतच गेली आणि समाजात मान-सन्मान जाईल, या भीतीने अखेर भल्या माणसाने आत्महत्या केली. बागपतच्या पलडी गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय शेर सिंह हे शेतीतूनच कुटुंबीयांचं पालनपोषण करत असत. त्यांचा मुलगा अमित याने सांगितलं की, सोमवारी सकाळी पाच वाजता ते शेतावर गेले होते. तिथेच त्यांनी पेरूच्या झाडाला फाशी लावून आत्महत्या केली. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेजारच्या शेतातील लोकांनी त्यांना झाडाला लटकलेलं पाहून आरडाओरडा सुरू केला. त्यांच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. तेव्हा कुटुंबीय आणि नातेवाईक शेतात दाखल झाले. तर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन शेर सिंह यांचा मृतदेह झाडावरून खाली उतरवला. शेर सिंह यांच्या पाकिटातून तीन पानांची सुसाईड नोट मिळाली. ज्यामध्ये त्यांनी अजय कुमार वर्मा आणि एका महिलेला आपल्या आत्महत्येस जबाबदार धरलं होतं.
अजय कुमार वर्मा आणि एका महिलेने मिळून माझ्याकडून 3.31 लाख रुपये उकळल्याचं त्यांनी लिहिलं होतं. ‘व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात क्रमांकावरून अश्लील व्हिडिओ कॉल आला होता. व्हिडिओ कॉल पाहताच त्यांना धक्का बसला, मात्र त्यांनी लगेच तो कट केला. परंतु व्हिडिओ कॉल करणाऱ्या लबाडांनी त्यांचा चेहरा आणि अश्लील दृश्याची स्क्रीन रेकॉर्ड केली. या रेकॉर्डिंगच्या आधारे ते शेर सिंह यांना धमकी देऊ लागले. ‘पैसे द्या, नाहीतर रेकॉर्डिंग व्हायरल करू.’ मग भीतीपोटी शेर सिंह त्यांना पैसे देत असत. मात्र पुढे ही मागणी आणखी वाढत गेली. अखेर समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी शेर सिंह यांनी झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. लग्नानंतर 13 दिवसांनी नवरी फरार, वाचा नवऱ्यानं का घेतलं काकाचं नाव? पोलिसांनी ही सुसाईड नोट ताब्यात घेतली असून शेर सिंह यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यांनी असा टोकाचा निर्णय घेण्याऐवजी आमच्याकडे यायला हवं होतं, असं पोलिसांनी म्हटलं. दरम्यान, शेर सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मुलगा अमित याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. 11 महिन्यांच्या या मुलाचा 29 ऑगस्टला पहिला वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याआधीच त्यांच्या घरात सर्वत्र अंधार पसरला आहे.