13 वर्षीय मुलीला धमकी
राजा मयाल, प्रतिनिधी भाईंदर, 16 जून : गेल्या काही दिवसांत लव्ह जिहाद प्रकरणावरुन देशात वातावरण चांगलचं तापलं आहे. नुकतेच पुणे जिल्ह्यातील मंचरमधून कथित लव्ह जिहाद चं प्रकरण समोर आलं होतं. ही घटना ताजी असताना एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिच्यावर इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी नकली बंदुकीने धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात दोन जणांवर कलम 354, 354 (अ) 506 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. काय आहे प्रकरण? पीडित मुलगी 13 वर्षांची असून भाईंदरला राहते. मुनव्वर मन्सुरी याने 12 जूनला रात्री साडेआठच्या सुमारास मुलीला इमारतीच्या टॅरेसवर नेऊन बुरखा, चैन आणि अंगठी देत बुरखा घालून तयार राहण्यास सांगितले. बुरखा घालून ये आपण पळून जाऊन लग्न करू असे त्या मुलीला सांगितले होते. मात्र, पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर मुनव्वर याने पीडित मुलीला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून तू बुरखा घालून इस्लाम धर्म कबुल केला नाहीस तर गोळ्या घालीन अशी धमकी दिली. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर भाईंदर पोलीसांनी मुन्नवर अन्सारी (वय 20) आणि अजीम मन्सुरी (वय 18) या दोघांना विनयभंगाच्या कलम 354, 354 (अ) 506 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी दिली आहे. वाचा - आईनेच 6 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करत गरम तव्यावर बसवलं अन्..; छ. संभाजीनगर हादरलं मंचरचा कथित प्रकरण काय होतं? पुण्याच्या मंचरमधून अल्पवयीन मुलीला घेऊन पळालेला तरुण चार वर्षांनी परतला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. 22 मे 2019 ला हे दोघे मंचर सोडून गेले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार ही दाखल केली. मात्र, तिचा शोध लागत नव्हता. ते पसार झाले होते. तेव्हा मुलगी अकरावीत शिकत होती, तर मिळेल ते काम करणारा जावेदचं दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. अशा परिस्थितीत दोघे घर सोडून गेले होते. महाराष्ट्रासह सुरत आणि उत्तरप्रदेशात त्यांनी चार वर्षे काढली. या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काम करून उदरनिर्वाह केला. या दरम्यान ती सज्ञान झाली आणि दोघांनी कोर्ट मॅरेज करत निकाहनामा ही केला.