पुणे, 05 फेब्रुवारी: पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकतं. मात्र, काही वेळा विवाहबाह्य संबंध, प्रेमप्रकरणामुळे या विश्वासाला तडा जाऊ लागतो. एकमेकांवरचा संशय वाढू लागतो. काही वेळा असे संशय सत्य स्थिती बाहेर आणण्यास पूरक ठरतात. पुण्यातील एका प्रकरणात काहीसं असंच पाहायला मिळालं. पत्नीला पतीच्या वर्तनावर संशय आला आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं तिनं पतीच्या कृत्याचा पर्दाफाश केला. पुण्यात एका हॉटेलमध्ये रुम घेण्यासाठी पत्नीच्या आधार कार्डाचा (Aadhar Card) वापर केल्याप्रकरणी एका व्यावसायिक आणि त्याच्या मैत्रीणीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या व्यावसायिकाला अटक केली असून, त्याची मैत्रीण अद्याप फरार आहे. याप्रकरणी पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Pune Crime Update) ‘गुजरातमधल्या एका व्यावसायिकाच्या पत्नीला त्याच्या वर्तनावर संशय आल्याने, तिनं आपल्या पतीवर लक्ष ठेवण्यासाठी एसयूव्हीमध्ये जीपीएस ट्रॅकर (GPS Tracker) बसवला. यातून जे सत्य बाहेर आलं, त्यानं या व्यावसायिकाचा पर्दाफाश केला. पत्नीच्या आधार कार्डाचा वापर करून या व्यावसायिकानं आणि त्याच्या मैत्रिणीनं पुण्यातील हॉटेलमध्ये रूम मिळवली. याबाबत पत्नीने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर व्यावसायिकाला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेली व्यक्ती गुजरातमधील उद्योगपती असून, त्याची पत्नी कंपनीत डायरेक्टर आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. हे वाचा- मक्याच्या शेतात चोर-पोलिसांचा खेळ; दागिने हिसकावणाऱ्या भामट्याला सिनेस्टाइल अटक ‘पुण्यातील एका हॉटेलमध्ये रुम (Hotel Room) मिळवण्यासाठी पत्नीच्या आधार कार्डाचा वापर केल्याच्या आरोपाखाली 41 वर्षांचा व्यावसायिक आणि त्याच्या मैत्रिणीविरुद्ध मंगळवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेला पती आपली फसवणूक करत आहे, असा संशय येताच तिनं पतीच्या एसयूव्हीमध्ये जीपीएस ट्रॅकर लावला होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या महिलेच्या पतीनं मी व्यवसायाच्या कामानिमित्त बेंगळुरूला जात आहे, असं सांगितलं होतं. त्यानंतर पत्नीनं लोकेशन तपासलं असता, त्यावेळी कार पुण्यात असल्याचं आढळून आलं होतं. या महिलेनं जेव्हा हॉटेलशी संपर्क साधला, तेव्हा व्यावसायिकानं पत्नीसह रूम घेतल्याचं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. हे वाचा- Mumbai: प्रेयसीच्या मागण्या संपत नसल्यानं तिलाच संपवलं; फिरायला घेऊन गेला अन्.. सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासल्यानंतर, तिचा पती दुसऱ्या महिलेसोबत आपलं आधार कार्ड वापरून हॉटेलमध्ये राहत असल्याचं या महिलेला समजलं. यानंतर आरोपी व्यावसायिक आणि त्याच्या मैत्रिणीविरुद्ध कलम 419 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यावसायिकाची मैत्रीण अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.