विद्येच्या माहेरघरात चक्क Phd चोरी!
पुणे, 28 डिसेंबर : महागड्या वस्तुंची चोरी झाली तर आपण समजू शकतो. पण एक वेगळीच घटना दिल्लीच्या जीटीबी एन्क्लेव येथे घडली आहे. या घटनेत एका विद्यार्थिनीच्या चक्क ज्ञानाचीच चोरी झाली आहे. अर्थात ज्ञानही मौल्यवान आहेच. पीएचडी करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा प्रबंधच चोरीला गेला. आश्चर्याची बाब म्हणजे चोरीचा आरोप विद्यार्थिनीच्या पर्यवेक्षकावर आहे. एका विद्यार्थिनीच्या प्रबंधास त्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नावे केलं. पीडित विद्यार्थिनीच्या जबाबावरून पोलिसांनी आयपीसी 406 म्हणजेच गुन्हेगारी विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचं वृत्त ‘नव भारत टाईम्स’ने दिलं आहे. एक 29 वर्षीय विद्यार्थिनी या घटनेतील पीडिता असून ती मूळची उत्तर प्रदेशची आहे आणि पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) मधून गणित विषयात पीएचडी करत आहे. ती विद्यार्थिनी सध्या जीटीबी हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये आपल्या बहिणीसोबत राहते. 2016 मध्ये तिने आयसरमध्ये प्रवेश घेतला. कोरोना आल्यामुळे कॉलेज तत्काळ बंद झालं. तेव्हा ती मुलगी दिल्लीला बहिणेकडे रहायला गेली. यादरम्यान कॉलेजचे काम ऑनलाइन चालू झालं. सप्टेंबर 2020 मध्ये पीएचडी व एमएससीसाठी पर्यवेक्षक म्हणून महाविद्यालयाने एका प्राध्यापकाची नियुक्ती केली. पण त्या प्राध्यापकाकडे एक दुसरी विद्यार्थिनी एमएससी व बीएससीसाठी थिसिस करत होती. कोरोनामुळे कॉलेज बंद असल्यामुळे सर्व चर्चा ही ऑनलाईनच व्हायची. ही चर्चा त्या प्राध्यापकसह दुसरी विद्यार्थिनीही ऐकत असे. 2121 पर्यंत असेच चालत राहिले. या प्रकरणात आरोप असा आहे की, जे संशोधनाचं काम पीडित विद्यार्थिनीचं होतं, ते संशोधन दुसर्या विद्यार्थिनीने स्वतःचं असल्याचा दावा करून संस्थेला त्याचा अहवाल सादर केला. त्या दाव्यावर त्या विद्यार्थिनीला पदवीही मिळाली. तथापि, 13 ऑगस्ट 2021 रोजी, पर्यवेक्षकाने पीडित विद्यार्थिनीला एक मेल पाठवून असं सांगितलं होतं की, या सर्व संशोधनाची मुख्य लेखिका तिच आहे, त्याच्या दुसऱ्या विद्यार्थिनीने कामाची कॉपी करूनच पदवी मिळवली आहे. पण तेव्हा जर विरोध केला तर आपलं भविष्य तो पर्यवेक्षक धोक्यात आणेल म्हणजे परीक्षेत नापास करेल या भीतीपोटी पीडित विद्यार्थिनीने तेव्हा काहीही आक्षेप घेतला नाही. वाचा - मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला जाब विचारायला गेला जवान,मृतदेहच घरी आला यानंतर पीडित विद्यार्थिनीने पुन्हा कामाला सुरुवात केली व जुलै 2022 मध्ये संशोधन पूर्ण केलं. हे काम सादर करण्याची वेळ आल्यावर पर्यवेक्षकाने मात्र पुन्हा हा संशोधन थिसिस दुसऱ्या विद्यार्थिनीच्या नावे सादर केला. तेव्हा मात्र, पीडित विद्यार्थिनीने पर्यवेक्षकाला जाब विचारला. तेव्हा आपण दुसऱ्या विद्यार्थिनीला वचन दिल्याचं पर्यवेक्षकाने सांगितलं. त्याचबरोबर जर तक्रार केलीस तर तुझ्या शैक्षणिक भविष्याची वाट लावेन अशी धमकीही आरोपी प्राध्यापक पर्यवेक्षकाने पीडितेला दिली. वाचा - बॉयफ्रेंडला पास करण्यासाठी प्रेयसीचा पराक्रम! आता डिग्री अन् सरकारी नोकरी जाणार? ही गोष्ट पीडित विद्यार्थिनीच्या बहिणीला कळताच तिने आयसरच्या संचालकांकडे लेखी तक्रार दिली. ही तक्रार मागे घेण्यासाठी पहिल्यांदा संस्थेने त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मात्र, नंतर तपासाअंती संस्थेने पर्यवेक्षकाला दोषी ठरवलं. तसेच एक वर्ष पर्यवेक्षण न करण्याचे आदेश दिले. मात्र, पीडितेला त्याच्यासोबतच काम करण्याची सक्ती करण्यात आली. यामुळे पीडित विद्यार्थिनी इतकी निराश झाली की, तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर मात्र हे प्रकरण पोलिसांना कळवण्यात आले व पर्यवेक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थेत अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांचं शोषण होत असल्याचं पीडितेच्या बहिणीचं म्हणणं आहे. यामध्ये आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून, एकाला आपला जीवही गमवावा लागला आहे. असं असतानाही संस्थेमार्फत मात्र पर्यवेक्षकाला वाचवण्याचं प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हस्तक्षेप करावा, अशी पीडित विद्यार्थिनीची व तिच्या बहिणीची मागणी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. हा प्रबंध कोणाचा आहे, याचा शोध घेतला जात असून, त्यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.