सेंट्रल जेलमध्ये दोन गँगस्टरची हत्या
चंदीगड, 27 फेब्रुवारी : हाय सिक्युरिटी सेंट्रल जेल गोइंदवालामध्ये दोन गँगस्टरच्या हत्येनंतर आता पंजाबमध्ये मोठे टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅनडामध्ये बसलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने या हत्यांची जबाबदारी घेतली आहे. खून झालेले दोन गुंड जगदीप सिंग जग्गू भगवानपुरियाचे जवळचे होते. धक्कादायक म्हणजे जग्गू भगवानपुरिया आणि लॉरेन्स बिश्नोई एकत्र काम करायचे. पण गोल्डी ब्रारने फेसबुकवर लिहिले की लॉरेन्स ग्रुपने या हत्याकांडाची जबाबदारी घेतलीय. परिणामी आता दोन्ही गट वेगळे झाले आहेत. लॉरेन्स टोळीचे बंबीहा टोळीशी आधीपासूनच वाद सुरू आहे, दरम्यानच्या काळात नवीन घडामोडीमुळे ट्रायंगल टोळीयुद्ध होण्याची शक्यता आहे. तुरुंगात मारले गेलेले कैदी कोण होते? गोइंदवाल तुरुंगात मरण पावलेले दोन लोक, मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग उर्फ मोहना हे जग्गू भगवानपुरियाचे शार्प शूटर होते आणि दोघेही सिद्धू मूसवाला खून प्रकरणाच्या कटात सामील होते. गेल्या वर्षी 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोघांना गेल्या वर्षी पोलिसांनी अटक केली होती. सिद्धूला मारण्यासाठी मनदीप सिंग तुफानला स्टँडबाय ठेवण्यात आले होते. तर मनमोहन सिंग उर्फ मोहना याला मूसेवालाची रेकी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. वाचा - संपत्तीचा वाद अन् मुलीवर वाईट नजर, पत्नीने पतीसह दोन्ही मुलांचा विषयच संपवला आता गँगस्टरची समीकरणे काय आहेत? भगवानपुरिया यांचे अकाली आणि काँग्रेस नेत्यांशी असलेले संबंधही चर्चेत होते. कबड्डीपटू संदीप नांगल अंबिया हत्याकांडातही भगवानपुरियाचे नाव ठळकपणे आले होते. संदीपने चालवलेल्या कबड्डी लीगला भगवानपुरिया यांनी संरक्षण दिल्याचा आरोप होता. या गुंडाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बटाला येथील भगवानपुरा गावातील जगदीप सिंग उर्फ जग्गू हा कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर खून, सुपारी हत्या, दरोडा, खंडणी, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची सीमापार तस्करी यासह 68 गुन्हे दाखल आहेत. त्याचे दविंदर बंबीहा टोळीशीही वैर आहे.
लॉरेन्स बिश्नोई हे देखील गँगस्टरच्या जगात एक मोठे नाव आहे. पंजाब विद्यापीठ चंदीगडमध्ये ते विद्यार्थी नेतेही राहिले आहेत. त्याच्यावर राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये खून, खंडणी, दरोडा आणि शस्त्रास्त्र कायद्यासह 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आता परिस्थिती अशी झाली आहे की गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई एकत्र आहेत, पण जग्गू भगवानपुरिया वेगळे होताना दिसत आहेत. एकीकडे बंबिहा गटही बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांच्या विरोधात आहे.