मजनू तिच्याच जीवावर उठला आणि त्याने हत्येचा कट रचला.
सुशांत सोनी, प्रतिनिधी हझारीबाग, 9 जून : प्रेमाला वय नसतं, प्रेमाला धर्म नसतो, असं म्हटलं जातं पण प्रेमात ममता तरी असते की नाही, अशी शंकाच आता निर्माण झाली आहे. प्रेम आंधळं असावं तरी किती? आज एकामागून एक प्रियकराने प्रेयसीचे तुकडे केल्याच्या धक्कादायक बातम्या कानावर येतात. तरीही प्रेम करावं पण डोळसपणे, हे अनेकजणींच्या लक्षातच येत नाहीये. झारखंडच्या हझारिबागेतून अशीच एक संतापजनक बातमी समोर आली आहे. तीन मुलांच्या आईला घेऊन पळालेला मजनू तिच्याच जीवावर उठला आणि त्याने हत्येचा कट रचला. या घटनेनं हझारीबागेत मोठी खळबळ उडाली आहे. हझारीबाग जिल्ह्यातील एका गावात प्रमोद कुमार (बदललेलं नाव) या व्यक्तीचं 2010 साली लग्न झालं. अगदी राजा-राणीसारखा त्याचा संसार सुरू होता. बघता बघता तो तीन मुलांचा बाप झाला. मात्र कामासाठी त्याला पंजाबला जावं लागलं. मग कुटुंब झारखंडमध्ये आणि तो पंजाबमध्ये असा त्याचा संसार सुरू झाला. आपली पत्नी एकटी तीन मुलांचा सांभाळ करतेय, याचं त्याला कौतुक होतं. परंतु त्याच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं. त्याच्या पत्नीचं पूर्ण लक्ष आपल्या तीन मुलांकडे नव्हतं, तर गावातल्या एका तरुणावर ती भाळली होती. या राहुल यादव नामक 21 वर्षीय तरुणाने तिला चांगलंच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. दोघं तास-तासभर फोनवर बोलायचे. एकमेकांना भेटायला आतुर असायचे. दोघांचं प्रेमप्रकरण एवढं जोरात सुरू होतं की, याबाबत अख्ख्या गावाला कळालं. हळूहळू तिच्या सासरच्या मंडळींनाही कुणकुण लागली. मग अखेर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या पोटच्या मुलांचा जराही विचार न करता ही आई बॉयफ्रेंडबरोबर पळून गेली.
त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस दोघं सूरतमध्ये राहिले. मग दिल्लीला गेले. तिकडे त्यांनी लग्न केल्याचंही बोललं जात आहे. जवळपास 8 महिने दोघं नवरा-बायको बनून राहत होते. मग राहुलने तिला आता माझ्या घरचे तुझा स्वीकार करायला तयार आहेत, असं सांगून गावी परतण्यासाठी तयार केलं. तीदेखील नव्या सासरी जायला मिळणार म्हणून खुश झाली आणि एका पायावर गावाकडे निघाली. परंतु राहुलच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्यांची गाडी कोडरमा स्थानकावर येताच राहुल आणि त्याचे मित्र तिच्या अंगावर धावून आले. त्यांनी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने आरडाओरडा करताच सर्वजण तिथून पसार झाले. मग ही महिला एकटीच राहुलच्या घरी गेली परंतु त्याच्या कुटुंबियांनी तिला घरात येऊ दिलं नाही. शिवाय लोकांच्या विचित्र नजरा बघून लाजेने ओलीचिंब झालेली ही महिला आपल्या जुन्या सासरीही जाऊ शकत नव्हती, त्यामुळे तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं. (Marriage : अरेंज की लव्ह, कोणतं मॅरेज बेस्ट? धक्कादायक आकडेवारी समोर) बरही पोलीस स्टेशनमध्ये झालेला सर्व प्रकार सांगून आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी तिने केली. राहुल आणि त्याच्या कुटुंबियांपासून आपल्या जीवाला धोका आहे, त्याचा मावस भाऊ फोन करून धमक्या देतोय, असंही तिने तक्रारीत म्हटलं. दरम्यान, पोलीस अधिकारी स्वीटी कुमारी यांनी या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं सांगितलं आहे.