मुंबई, 4 मार्च : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. दादरच्या शिवाजी पार्कवर संदीप देशपांडे शुक्रवारी सकाळी जॉगिंगला गेले होते, तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याबाबतच्या तपासाबाबतची माहिती दिली. ‘संदीप देशपांडे यांच्यावरच्या हल्ल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य माहिती समोर आली, यानंतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. भांडूपमधून एका 56 वर्षांच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं गेलं. त्याने प्राथमिकरित्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, पण यामागे कोण आहे, याचा शोध सुरू आहे. दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली आहे. या दोघांना भांडूपमधून पकडलं आहे. याचा अधिक तपास सुरू आहे,’ असं पोलीस म्हणाले. ‘हत्येचा प्रयत्न, अपरहण अशाप्रकारचे गुन्हे मुख्य आरोपीवर दाखल करण्यात आले आहेत. अशोक खरात वय 56 आणि किशन सोळंकी अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातला अशोक खरात हा मुख्य आरोपी आहे, तर दुसरा आरोपी किशन सोळंकी याचं वय 35-40 आहे. मुख्य आरोपी अशोक खरात हा महाराष्ट्र माथाडी कामगार आणि जनरल सेना उपाध्यक्ष आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘हे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेसोबत जोडले जात आहेत, यातील मुख्य आरोपी 56 वर्षांचा आहे. आणखी दोन आरोपींची नावं निष्पन्न झाली आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे. त्यांचा मुख्य हेतू काय होता, याचाही शोध सुरू आहे. जो 56 वर्षांचा मुख्य आरोपी आहे, त्याच्या नेतृत्वात इतर तिघांनी हे कृत्य केलं आहे,’ असं अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सांगितलं. संदीप देशपांडेंवर हल्ला, मनसेच्या आरोपांना वरुण सरदेसाईंनी दिले जशास तसे उत्तर ‘आम्ही या प्रकरणात तपास करत होतो, जवळपास 8 टीम बनवण्यात आल्या होत्या. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. भांडूपमधून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. एक आरोपी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. हल्ल्याचा उद्देश हा राजकीय आहे का व्यावसायिक याचा तपास सुरू आहे. आरोपींकडून जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार गुन्ह्यात आणखी दोन आरोपी सहभागी असल्याचं कळतंय. या कटात आणखी काहीजण सहभागी आहेत का? याचाही तपास आम्ही करत आहोत,’ अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.