गुवाहाटी, 26 जुलै : रागात असलेल्या व्यक्तीचं स्वत:च्या वागण्यावर नियंत्रण नसतं, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलेलं असेल. रागाच्याभरात एखादी व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तींनाही हानी पोहचवू शकते. आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. तिथे एका व्यक्तीनं आपली पत्नी आणि सासू-सासऱ्यांचा खून केला आहे. या तिहेरी हत्याकांडानंतर 25 वर्षांचा नजीबूर रहमान बोरा आणि 24 वर्षांची संघमित्रा घोष यांच्यातील प्रेमसंबंधांचा शेवट झाला. आरोपीनं सोमवारी नऊ महिन्यांचं बाळ हातात घेऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकॅनिकल इंजिनीअर असलेला नजीबूर आणि संघमित्रा यांची जून 2020 मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी देशव्यापी लॉकडाउन होता. दोघांची फेसबुकवर मैत्री झाली. काही महिन्यांतच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघं कोलकात्याला पळून गेले. संघमित्राच्या आई-वडिलांनी तिला घरी परत आणलं. पण, तिनं आधीच कोलकाता कोर्टात नजीबूरशी लग्न केलं होतं. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये संघमित्राचे पालक संजीव घोष आणि जुनू घोष यांनी तिच्यावर चोरीचा आरोप करत पोलिसात तक्रार नोंदवली. यामुळे संघमित्राला एक महिना न्यायालयीन कोठडीत घालवावा लागला. जामिन मिळाल्यानंतर ती तिच्या पालकांच्या घरी परतली. जानेवारी 2022 मध्ये, संघमित्रा आणि नजीबूर पुन्हा पळून चेन्नईला गेले. तिथे ते पाच महिने राहिले. ऑगस्टमध्ये हे जोडपं गोलाघाटला परतलं तेव्हा संघमित्रा गरोदर होती. ते नजीबूरच्या घरी राहू लागले. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांना एक मुलगा झाला. ते पाठीमागून पळतच आले, तो खाली पडला आणि डोक्यातच झाडली गोळी, अंगावर शहारे आणणारा LIVE VIDEO मात्र, चार महिन्यांनंतर (मार्च 2023) संघमित्रा आपल्या तान्ह्या मुलासह नजीबूरचं घर सोडून तिच्या पालकांच्या घरी गेली. तिनं नजीबूरवर छळ केल्याचा आरोप केला आणि पोलीस तक्रार नोंदवली. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून नजीबुरला अटक करण्यात आली. 28 दिवसांनंतर त्याची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर नजीबूरला आपल्या मुलाला भेटायचं होतं; पण संघमित्राच्या कुटुंबीयांनी त्याला भेटू दिलं नाही. 29 एप्रिल रोजी नजीबूरच्या भावानं संघमित्रा आणि तिच्या कुटुंबीयांवर नजीबूरवर हल्ला केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार नोंदवली. सोमवारी दुपारी दोन्ही कुटुंबांमधील तणाव टोकाला गेल्यानं नजीबूरनं पत्नी संघमित्रा आणि तिच्या पालकांची कोयत्यानं हत्या केली. त्यानंतर तो आपल्या नऊ महिन्यांच्या बाळासह पळून गेला. नंतर त्यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोष यांच्या घरी, संघमित्रा आणि तिच्या पालकांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आसामचे पोलीस प्रमुख जी. पी. सिंग यांनी ट्विट केलं की, आरोपीविरुद्ध खून आणि घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण हत्यांकांडाचा तपास करण्यासाठी राज्य सीआयडी पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. फॉरेन्सिक पथकांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून, पुढील तपास सुरू आहे.