लखनऊ 22 डिसेंबर : उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधी कायद्यांतर्गत (Love Jihad Law) शिक्षा सुनावली गेल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. कानपूरच्या एका तरुणाला या कायद्याअंतर्गत 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 30 हजार रुपये दंड अशी शिक्षा (Kanpur Youth Jailed Under Love Jihad Act) देण्यात आली आहे. याप्रकरणी 2017 मध्ये पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यावर्षी लागू करण्यात आलेल्या लव्ह जिहाद विरोधी कायद्याची कलमेही या प्रकरणात लागू करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 साली जावेद नावाच्या एका तरुणाने आपले नाव मुन्ना असल्याचे सांगत एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर लग्न करण्यासाठी म्हणून हे दोघे पळून गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांचा शोध घेत, दुसऱ्याच दिवशी तरुणाला अटक केली होती.
यावेळी तरुणीने पोलिसांना सांगितले, की या तरुणाने घरी गेल्यानंतर तिला आपण जावेद असल्याचे सांगितले. तसेच त्याने या तरुणीला आता आपण ‘निकाह’ (Kanpur Love Jihad) करूयात, असे सांगितले. या गोष्टीला तरुणीने विरोध केला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या तरुणीने जावेदवर बलात्काराचा आरोपही केला होता, ज्यामुळे पोलिसांनी जावेद विरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. उत्तर प्रदेश सरकारने 2020 मध्ये बेकायदेशीर धर्मांतर बंदी अध्यादेश (Prohibition of Unlawful Conversion of Religion Ordinance) जारी केला होता. या अंतर्गत, कोणतीही व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या व्यक्तीला बळजबरी करून, खोटे बोलून, फसवून, आमिषाला बळी पाडून, लग्नाचे आमिष दाखवून वा अन्य पद्धतीने फसवणूक करून धर्मांतर करण्यास सांगू शकत नाही. किंवा अशा प्रकारचा कटही रचू शकत नाही. या अध्यादेशाचे यावर्षी कायद्यात रुपांतर करण्यात आले.
हा कायदा मोडणाऱ्याला गुन्ह्याची गंभीरता पाहून, कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 50 हजार रुपये दंड आणि जास्तीत जास्त दहा वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जबरदस्तीने धर्मांतर केलेली व्यक्ती अल्पवयीन वा एससी/एसटी प्रवर्गातील महिला असल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात येतो. याच कायद्याला लव्ह जिहाद विरोधी कायदा (What is Love Jihad act) म्हणूनही ओळखले जाते. या कायद्यानुसार, धर्मांतराच्या उद्देशाने केलेल्या लग्नाची मान्यताही रद्द केली जाते. आतापर्यंत उत्तर प्रदेश पोलिसांनी या कायद्याअंतर्गत एकूण 108 गुन्हे दाखल केले आहेत. यातील बरेलीमध्ये सर्वाधिक (28), तर कानपूरमध्ये सर्वात कमी (2) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातच आता कानपूरमधील युवक या कायद्यांतर्गत शिक्षा मिळालेला पहिला व्यक्ती ठरला आहे.