पुणे, 25 नोव्हेंबर : पुण्याच्या आंबेगाव येथील प्रसिद्ध उद्योजक देवेंद्र शहा (Parag Shaha) यांच्या घर आणि उद्योग-व्यवसायांवर आयकर विभागाने छापा (Income Tax Raid) टाकला आहे. आयकर विभागाची छापेमारी ही सध्या सुरुच आहे. एका प्रसिद्ध उद्योजकाच्या घरावर आयकर विभागाकाने छापेमारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र शहा हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये आयटीची कारवाई सुरु आहे. आयकर विभागाने आतापर्यंत शहा यांच्या पराग मिल्क उद्योग समुहावर छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या चार पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे पराग मिल्क आणि गोवर्धन उद्योग समुहाचे दुध उत्पादनात जगभरात जाळं आहे. अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्कसोबत काही व्यवहार आढळून आल्याने आयटीची कारवाई सुरु असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. हेही वाचा : Congress ला बसणार मोठा झटका, गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस TMC सोबत युती करण्याच्या तयारीत
आयकर विभागाच्या एका पथकाने आज पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास मंचर येथील पराग डेअरीवर छापा टाकला. तर दुसऱ्या पथकाने अवसरी येथील पीर डेअरीवर पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. त्यानंतर तिसऱ्या पथकाने आज सकाळी सात वाजता थेट देवेंद्र शहा यांच्या निवासस्थानी छापा टाकला. तर चौथा छापा हा देवेंद्र शहा यांच्या मित्राच्या घरी सकाळी नऊ वाजता टाकल्याची माहिती आहे. आयटीकडून कार्यालयांची देखील झडती सुरु आहे. याशिवाय छापेमारी देखील सुरुच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा : LPG Subsidy हवी असेल तर आजच पूर्ण करा हे महत्त्वाचं काम, वाचा सविस्तर
पुण्यात प्रसिद्ध उद्योजकांवर छापेमारीची किंवा कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणी त्यांची कसून चौकशी देखील केली होती. त्यानंतर ईडीने त्यांची 40 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली होती.