गुजराती जोडप्याच्या छळाचा व्हिडिओ व्हायरल
अहमदाबाद, 20 जून : गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत जाण्यासाठी भारतीयांची धडपड वाढली आहे. थेट अमेरिकेत जाणे शक्य नसेल तर जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून ते या देशात जाण्याचा प्रयत्न करतात. असं करणे अनेक लोकांच्या जीवावर बेतलं आहे. मात्र, त्यानंतरही लोक हा धोका पत्करताना दिसत आहेत. डिंगुचासारखी प्रकरणे या घडामोडींची मोठी साक्ष आहेत. अशी प्रकरणे केवळ गुजरात किंवा भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेचा विषय झाली. आता पुन्हा एकदा अमेरिकेत जाणाऱ्या गुजराती कुटुंबावर छळ सोसण्याची पाळी आली आहे. या दाम्पत्यावर अमेरिकेला नेणार सांगून पैशासाठी अत्याचार करण्यात आला. तरुणावर अत्याचार केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. अहमदाबादमधील एका जोडप्याला हैदराबादमध्ये ओलिस करून तेहरानला नेण्यात आल्याची बातमी स्थानिक माध्यमांमध्ये आली. यामध्ये एक व्हिडीओ व्हायरल होत असून खंडणी मागण्याचे प्रकरणही समोर येत आहे. अहमदाबादच्या कृष्णनगर येथे राहणारे पंकज पटेल आणि त्यांची पत्नी निशा अशी पीडितांची नावे आहेत. या दाम्पत्याला अहमदाबादहून हैदराबादला आणण्यात आले अमेरिकेला निघालेले दाम्पत्य अहमदाबादहून प्रथम हैदराबादला पोहोचले आणि पाच-सात दिवस येथे राहिल्यानंतर त्यांना इतर पाच जोडप्यांसह इराणला नेण्यात आले, तेथे त्यांना ओलीस ठेवले आणि खंडणीची मागणी करण्यात आली. दाम्पत्यावर अत्याचार केल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ कुटुंबातील अन्य सदस्यांना पाठवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. कुटुंबाला पाठवला व्हिडिओ एका भयानक व्हिडिओमध्ये पंकज पटेल यांना बांधून त्याचा छळ करण्यात येत असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये पंकज पटेल यांना झोपवून एक व्यक्ती ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या पाठीवर जखमा करत असल्याचे दिसत आहे. वाचा - 2 मुलांना विहिरीत फेकलं, पत्नीचा दाबला गळा; डॉक्टरने स्वतःसह संपवलं कुटुंब, पुणे हादरलं राज्य आणि क्रेंदाच्या मदतीने कुटुंबाची सुटका तेहरानमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या पंकज आणि निशा यांची सुटका करण्यात आली आहे. पंकजवर ब्लेडने वार करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पंकज आणि त्यांच्या पत्नीला भारतात आणण्यात येत आहे. याआधी 11 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पंकजच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअॅप मेसेज आला, ज्यामध्ये पंकजवर झालेल्या अत्याचाराची छायाचित्रे होती. हा मेसेज कुटुंबीयांना दिसताच त्यांनी गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांना मदतीची विनंती केली आणि संपूर्ण प्रकार सांगितला. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे तेहरानमध्ये नियुक्त करण्यात आलेले डेप्युटी चीफ ऑफ मिशन जॉन माई यांच्याशी पंकज आणि निशाचा शोध घेण्यासाठी संपर्क करण्यात आला. सरकारच्या सतर्कतेमुळे अखेर तेहरानमध्ये पंकज आणि निशाचे लोकेशन सापडले, तेथून पोलिसांच्या मदतीने पंकज आणि निशा यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. एजंट पैसे घेऊन गायब मिळालेल्या माहितीनुसार, पंकज पटेल यांनी अभय रावल नावाच्या व्यक्तीला अमेरिकेला जाण्यासाठी पैसे दिले होते. अभय रावल पैसे घेऊन निघून गेल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर पंकज पटेलने अमेरिकेला जाण्यासाठी एजंटला 1 कोटी 15 लाख रुपये दिले होते. डिंगुचा कुटुंबाचा थंडीत गारठून मृत्यू गेल्या वर्षी गांधीनगरच्या डिंगुचा कुटुंबाचा अमेरिकेला जाताना मृत्यू झाला होता. या कुटुंबाला आधी दुबईला नेण्यात आले होते. तेथून टोरंटो आणि विनिपेग मार्गे अमेरिकेत त्यांची तस्करी करण्याची योजना होती. विनिपेगमध्ये बर्फात अडकल्याने दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता.