कोलकत्ता, 6 जून : कोलकत्त्यात (Calcutta News) ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघातून दुहेरी हत्याकांडाची (Double Murder) घटना समोर आली आहे. ही घटना ममता बॅनर्जी यांच्या कालिघाट घराजवळील भागात घडली. यात अशोक शहा या शेअर बाजारासंबंधित काम करणाऱ्या व्यक्तीची त्याच्या घरात हत्या करण्यात आली. छातीत गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय त्याची पत्नी रश्मी शहा हिचा मृतदेह घराच्या दुसऱ्या खोलीत आढळून आला. तिच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले होते. शहा दाम्पत्य बऱ्याच काळापासून या परिसरात राहत होतं. या घटनेची सूचना मिळताच कोलकाता पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाली. या भीषण गुन्ह्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. सीपी विनीत गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पीडितांच्या शरीरावर चाकूने अनेक जखमा झाल्या आहेत. घरातील वस्तूंची आणि कपाटांची तोडफोड केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी भागातील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले असून स्निफर डॉगच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.