JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Bully Bai App : प्रतिष्ठित मुस्लिम महिलांचा 'सौदा' करणाऱ्या 'बुल्लीबाई' अ‍ॅपचा पंचनामा, उत्तराखंड ते बंगळुरु कनेक्शन उघड

Bully Bai App : प्रतिष्ठित मुस्लिम महिलांचा 'सौदा' करणाऱ्या 'बुल्लीबाई' अ‍ॅपचा पंचनामा, उत्तराखंड ते बंगळुरु कनेक्शन उघड

बुल्ली बाई अ‍ॅप (Bully bai App) प्रकरणी पोलिसांनी एका 21 वर्षीय आरोपीला बंगळुरु येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्याला मुबंईत आणलं गेलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जानेवारी : मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित महिलांचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया (social media) अकाउंटवरुन चोरुन ‘बुल्ली बाई’  (Bully bai) अ‍ॅपवर अपलोड करुन त्यांची बोली लावण्याचं घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपींच्या नांग्या ठेचण्यात सायबर पोलिसांना (Mumbai Cyber Police) बऱ्यापैकी यश आलंय. पोलिसांनी या प्रकरणी उत्तराखंड (Uttarakhand) येथील एका महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. तीच या प्रकरणात मास्टमाईंड असल्याची शक्यता आहे. तसेच मुंबईच्या सायबर पोलिसांनी एका 21 वर्षीय आरोपीला थेट बंगळुरुतून (Bangalore) बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाचं उत्तराखंड ते बंगळुरु असं मोठं कनेक्शन असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात आरोपींचा मोठा ग्रुप असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस त्या दृष्टीकोनातून तपासही करत आहेत. बुल्ली बाई (Bullibai) प्रकरण आहे तरी काय? बुल्ली बाई (Bully bai) गिटहब (GitHub) नावाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सोशल मीडियावरील लोकांच्या माहितीनुसार, हे अ‍ॅप उघडताच एका मुस्लिम महिलेचा चेहरा समोर येतो. याला बुल्ली बाई असे नाव देण्यात आलं आहे. किंमत टॅगसह मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो शेअर केले आहेत. यासोबतच बुल्लीबाई या ट्विटर हँडलवरूनही त्याचा प्रचार केला जात आहे. या अ‍ॅपद्वारे मुस्लिम महिलांना बुक करता येईल, असे ट्विटर हँडलवर लिहिले आहे. हेही वाचा :  पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार?, शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्या विधानाने रंगली चर्चा बंगळूरुतून आरोपीला बेड्या बुल्ली बाई अ‍ॅप (Bully bai App) प्रकरणी पोलिसांनी एका 21 वर्षीय आरोपीला बंगळुरु येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्याला मुबंईत आणलं गेलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव विशाल कुमार असं आहे. तो सिव्हील इंजीनियरिंगचं शिक्षण घेतोय. या प्रकरणात तो एकटा आरोपी नाही, तर त्यांचा एक ग्रुपच असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. विशेष संबंधित अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी किंवा मास्टमाईंड ही उत्तराखंड राज्यातील एक महिला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचदिशेनेदेखील पोलिसांचा तपास सुरु आहे. दरम्यान, पोलिसांनी सध्या ज्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तो आरोपी स्वत:ला सीख समाजाचा असल्याचा वर्ताव करत होता. त्यासाठी त्याने 31 डिसेंबरला स्वत:चं नावदेखील बदललं होतं. जेणेकरुन आरोपी हा पंजाबी आहे, अशा समज सुरक्षा यंत्रणा, सायबर सेल आणि पोलिसांना होईल. महिला आरोपीला उत्तराखंडमधूम बेड्या या प्रकरणी एका महिलेला उत्तराखंड येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिला तिथल्या लोकल कोर्टात हजर करुन ट्रांजिट रिमांड घेऊन मुंबईच्या सायबर सेल कार्यालात आणण्यात येत आहे. याप्रकरणात बंगळुरु येथून अटक करण्यात आलेला विशाल कुमार हा सहआरोपी आहे. तर उत्तराखंडची महिला आरोपी या प्रकरणात मास्टरमाईंड असू शकते, अशी माहिती आता तपासातून समोर येतेय. हेही वाचा :  पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजित पवारांना मोठा झटका, धक्कादायक निकाल आला समोर महिला आरोपी आणि विशालची सोशल मीडियावर भेट पोलिसांनी केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. बंगळुरु येथून अटक करण्यात आलेल्या विशाल कुमारची सोशल मीडियाद्वारे उत्तराखंड येथे अटक करण्यात आलेल्या महिलेसोबत ओळख झाली होती. आरोपी महिलेने विशालला इन्स्टाग्रामद्वारे मैत्री केली होती. त्यानंतर तिने त्याला बुली अ‍ॅपशी जोडलं होतं. विशेष म्हणजे उत्तराखंडच्या महिलेची आणखी एका तरुणासोबत मैत्री आहे. मात्र तो तरुण सध्या फरार आहे. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. उत्तराखंडच्या महिलेने फरार आरोपीसोबत मिळून फेन्टसीसाठी हे या अ‍ॅपची निर्मिती केली, अशी माहिती आतापर्यंत झालेल्या पोलीस तपासातून समोर आलीय. या अ‍ॅपनिर्मितीनंतर आरोपींनी मुस्लिम समाजाच्या प्रतिष्ठित महिला, मुलींच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन डाऊनलोड केले. त्यानंतर ते फोटो बुल्ली अ‍ॅपवर अपलोड केले. या प्रकरणामागील मास्टरमाईंड उत्तराखंडची महिलाच आहे आणखी दुसरं कोणी आहे, या प्रकरणात आणखी कोणकोण जोडलं गेलंय, याचा तपास मुंबईच्या सायबर पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, बंगळुरुवरुन अटक करण्यात आलेल्या आरोपी विशाल कुमारला मुंबईच्या स्पेशल कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर आरोपीची मेडिकल चाचणी केली जाईल. याप्रकरणात आणखी काहीजणांना अटक होईल, अशी माहिती क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी दिली आहे. संबंधित प्रकरणाविषयी आणखी सविस्तर माहिती…. रिपॉजिटरी होस्टिंग सेवा गिटहब (GitHub) वर तयार केलेल्या वादग्रस्त मोबाइल अ‍ॅपमध्ये मुस्लिम महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. ‘बुल्ली बाई’ (Bulli Bai) नावाचे हे अ‍ॅप मुस्लिम महिलांच्या फोटोंचा कथित लिलाव करताना आढळून आले. काही महिन्यांपूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी असेच एक अ‍ॅप ‘सुली डील’ (Sulli Deal) तयार केले, ज्यामध्ये शेकडो मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून घेतलेली छायाचित्रे अपलोड आणि लिलाव करण्यात आली. सोशल मीडियावर नाराजी पसरल्यानंतर हे अॅप काढून टाकण्यात आले होते. यानंतर एका महिला पत्रकाराने सोशल मीडिया आणि इंटरनेटवर मुस्लिम महिलांचा छळ आणि अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध त्वरित एफआयआर नोंदवून तपास करण्याची मागणी केली आहे. तिच्या वतीने तक्रारीत म्हटले आहे, की “आज सकाळी मला हे समजल्यानंतर धक्का बसला की bullibai.github.io नावाच्या वेबसाइट/पोर्टलवर माझा एक आक्षेपार्ह फोटो आहे, ज्यामध्ये छेडछाड करण्यात आली आहे. यावर तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. कारण, माझ्यासारख्या स्वतंत्र महिला आणि पत्रकारांना त्रास देणे हा यामागील उद्देश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या