18 वर्षांपूर्वीचं राजू पाल हत्याकांड
लखनौ, 14 मार्च : उत्तर प्रदेशमध्ये 24 फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये उमेश पाल यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात अजूनही पोलिसांना 5 मुख्य आरोपींना शोधण्यात यश आलेलं नाही. यासाठी 150 पेक्षा जास्त पोलीस काम करत आहेत. विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमारीही केली आहे. इतकंच नाही तर आता या 5 आरोपींवरील बक्षिसाची रक्कम अडीच लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. उमेश पाल हत्याकांडाप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये 18 वर्षांपूर्वी एक हत्याकांड झालं होतं. बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार करण्यात आलं होतं. ‘आज तक’नं राजू पाल हत्याकांडाबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. राजू पाल, त्यांची पत्नी पूजा पाल आणि उमेश पाल बसपमध्ये होते. अतीक अहमद आणि त्यांचा भाऊ अश्रफ समाजवादी पक्षामध्ये होते. राजू पाल यांनी बसपकडून तिकीट मिळवण्यासाठी अतीक अहमद आणि त्यांच्या कटुंबाविरुद्ध जोरदार प्रचार केला होता. 2004 मध्ये अतीक अहमद हे सपाकडून फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन खासदार झाले होते. त्याआधी ते अलाहाबाद पश्चिम मतदारसंघामधून आमदार होते. खासदार झाल्यामुळे त्यांची विधानसभेची जागा रिकामी झाली होती. तिथे पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर अतीक अहमद यांचे धाकटे भाऊ अश्रफ यांना उमेदवारी देण्यात आली. राजू पाल यांना बसपकडून तिकीट मिळालं व त्यांनी अश्रफ यांना हरवून आमदारकी मिळवली. पोटनिवडणुकीत झालेला पराभव अहमद कुटुंबीय पचवू शकले नाहीत. त्यामुळे राजू पाल यांना वाटेतून दूर करण्याचा डाव रचण्यात आला. 25 जानेवारी 2005 ला राजू पाल घरी परत येत असताना काही मारेकऱ्यांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली. राजू पाल स्वतः क्वालिस गाडी चालवत होते. त्यांना वाटेत भेटलेली मित्राची पत्नीही त्यांच्यासोबत होती. काही कारणानं राजू पाल यांनी वाटेत गाडी थांबवली असता त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलं. असं म्हणतात, की मारेकऱ्यांची संख्या जवळपास 12 होती. राजू यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या समर्थकांनी त्यांना टेम्पोत घालून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मारेकऱ्यांनी राजू यांचा जीव वाचू नये म्हणून तब्बल 5 किलोमीटर टेम्पोचा पाठलाग केला. टेम्पोवर गोळ्याही झाडल्या. यात राजू पाल वाचू शकले नाहीत. त्यांना 19 गोळ्या लागल्या होत्या. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेल्या आणखी 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. वाचा - पालघर: औषधे घेण्यासाठी जात असतानाच उचललं, अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य राजू पाल यांचं 9 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर अलाहाबाद पश्चिममध्ये पुन्हा पोटनिवडणूक झाली. यात त्यांच्या पत्नी पूजा पाल यांना तिकीट मिळालं. मात्र अतीक यांचे भाऊ अश्रफ अहमद यांनी पूजा यांचा पराभव केला. पूजा पाल यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अतीक अहमद, अश्रफ अहमद यांच्यासह 9 जणांवर राजू पाल हत्या प्रकरणात गुन्हा नोंदवला.
राजू पाल हत्या प्रकरणाला आता 18 वर्षं झालीत. उत्तर प्रदेशमधली राजकीय समीकरणंही बदलली आहेत. त्या काळी समाजवादी पक्षाच्या विरोधक असलेल्या पूजा पाल आता त्याच पक्षातून आमदार बनून निवडून आल्या आहेत. अतीक अहमद यांना सपानं बाहेरचा रस्ता दाखवलाय. राजू पाल यांच्याप्रमाणेच उमेश पाल यांचीही उत्तर प्रदेशमध्ये भर रस्त्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणात अतीक अहमद यांचा मुलगा असद, खास गुर्गे अरमान, गुलाम, गुड्डू आणि साबीर या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आणखी दोन आरोपी अरबाज आणि विजय चौधरी उर्फ उस्मान यांचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. ज्या कारमधून शूटर उमेश यांची हत्या करण्यासाठी आले, ती क्रेटा कार अरबाज चालवत होता, तर विजय चौधरी यानं सर्वांत आधी उमेश यांच्यावर गोळ्या झाडल्या असं पोलिसांचं म्हणणं आहे. ज्याच्या हॉस्टेलच्या खोलीत हत्येचा कट रचण्यात आला त्या सदाकत खान यालाही पोलिसांनी अटक केली आहे. उमेश पाल यांच्या हत्येला तीन आठवडे उलटल्यानंतरही त्यांचे हल्लेखोर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 18 वर्षांपूर्वी घडलेल्या राजू पाल हत्या प्रकरणाप्रमाणेच पुन्हा एक हत्याकांड घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे.