अधिकारी जाळ्यात अडकला
पुणे 05 मे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) डीआरडीओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला हनी ट्रॅप प्रकरणात अटक केली आहे. हा अधिकारी पाकिस्तानातील गुप्तचर संस्थांच्या संपर्कात असल्याचा एटीएसला संशय आहे. आरोपी अधिकाऱ्याने डीआरडीओच्या अनेक क्षेपणास्त्रांसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्याविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीआरडीओकडून या संदर्भात तक्रार आल्यानंतर तपास सुरू करण्यात आल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एटीएसला सांगितलं. आरोपीला बुधवारी अटक करून गुरुवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं, तिथून एटीएसने त्याची कोठडी मिळवली. हे प्रामुख्यानं हनीट्रॅपचं प्रकरण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांची छायाचित्रे वापरून ज्येष्ठ शास्त्रज्ञाला फसवण्यात आलं. यानंतर तो पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शास्त्रज्ञ गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपासून व्हॉईस संदेश आणि व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानस्थित ऑपरेटरच्या संपर्कात होता. त्याने काही संवेदनशील माहिती ऑपरेटरसोबत शेअर केल्याचा संशय आहे.
डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना एटीएसने अटक केली आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार, या अटकेचं कारण असं सांगण्यात आलं आहे की, डीआरडीओचे अधिकारी पुण्यातील डीआरडीओ कार्यालयातून व्हॉईस मेसेज, व्हिडिओ कॉलिंगद्वारे, व्हॉट्सअॅपद्वारे भारताचा शत्रू पाकिस्तानच्या इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या संपर्कात आले होते. यादरम्यान संचालकाने आपल्या पदाचा देशाविरुद्ध गैरवापर केला आहे. डीआरडीओच्या ऑपरेटरने पाकिस्तानला बेकायदेशीरपणे गुप्तचर माहिती दिल्याचं तपास यंत्रणेच्या समोर आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅपमध्ये अडकले आणि त्यांनी एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला संवेदनशील माहिती दिली. डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना निवृत्त होण्यासाठी फक्त 6 महिने बाकी आहेत. आरोपी पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील एका महिलेच्या संपर्कातही होते. डीआरडीओची दक्षता आणि गुप्तचर पथकं अनेक महिन्यांपासून आरोपीवर नजर ठेवून होते. डीआरडीओ मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर एटीएसने गुरुवारी अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.