वेटरचा झाला डॉन
मुंबई, 21 एप्रिल : गुन्हेगार जन्मतः तयार होत नाहीत. बऱ्याचदा परिस्थिती त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे घेऊन जाते. अर्थात यामुळे त्यांना क्षमा मिळत नाही. मुंबईमध्ये वेटर असलेल्या 18 वर्षांच्या एका मुलालाही अशाच परिस्थितीतून जाव लागलं व त्यानंतर तो बनला मुंबईचा डॉन. कोण होता हा मुंबईचा डॉन? त्याच्याबद्दल जाणून घेऊ या.
एका गुंडाचा खून केल्यामुळे एक तरुण वेटर डॉन बनला. त्याचं नाव सदानंद नाथू शेट्टी उर्फ साधू शेट्टी होतं. कर्नाटकातल्या उडुपी जिल्ह्यात पन्यूर बेलापू गावात 1952मध्ये त्याचा जन्म झाला. 1970मध्ये रोजगार मिळवण्यासाठी तो मुंबईत आला. पुष्कळ शोधूनही काम मिळालं नाही. शेवटी काही दिवसांनी त्याला चेंबूरच्या हॉटेलात वेटर म्हणून काम मिळालं. तो काम करून तिथेच राहायचा. एकदा चेंबूरचा गुंड आणि शिवसेनेचा नेता विष्णू दोगले चव्हाण वसुलीसाठी हॉलेटमध्ये आला असताना त्यानं हॉटेल मालकाला मारहाण सुरू केली. ते पाहून पित्त खवळलेल्या सदानंदने लोखंडी सळई विष्णू दोगलेच्या डोक्यात घातली. यामुळे विष्णू दोगलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सदानंद गुन्हेगारी विश्वाकडे वळला. त्याच दरम्यान तमीळ अंडरवर्ल्ड डॉन वरदराजन मुदलियारचं त्याच्याकडे लक्ष गेलं. शेट्टी तुरुंगातून बाहेर आल्यावर मुदलियारने त्याला स्वतःच्या गँगमध्ये घेतलं. त्याच्या कामामुळे तो वरदराजनच्या आणखी जवळचा झाला. त्याचे गुन्हेही वाढत होते. विष्णू दोगले चव्हाणचे निकटवर्तीयही त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी टपले होते. दोगलेच्या 3 जणांनी शेट्टीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यात शेट्टी मेला असं समजून ते पळाले; मात्र जखमी झालेला सदानंद त्या हल्ल्यातून वाचला. रुग्णालयात 4 महिने उपचार घेऊन तो बरा झाला. त्यानंतर त्याने त्या तिन्ही हल्लेखोरांना एकएक करून मारलं. तमीळ अंडरवर्ल्ड डॉन मुदलियारला मुंबईचा कंटाळा आल्याने तो मद्रासला निघून गेला. त्यामुळे त्याच्या गँगची जबाबदारी सदानंद शेट्टीवर आली. आता सदानंद शेट्टी साधू शेट्टी बनला होता. गँगमधले लोक त्याला साधू भाई म्हणायचे. त्यादरम्यान शेट्टी छोटा राजन आणि बडा राजनच्या संपर्कात आला. राजनसोबत अवैध दारूच्या व्यवसायात तो सहभागी झाला. 1982मध्ये शेट्टीवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम लावण्यात आले. 21 सप्टेंबर 1983 रोजी बडा राजनच्या हत्येनंतर त्याच्या गँगची जबाबदारी छोटा राजनवर आली. शेट्टी आणि तो दोघं मिळून काम करू लागले. दरम्यान, 1981मध्ये डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ शब्बीर इब्राहिमची हत्या करण्यात आली. त्यामागे करीम लालाचा हात होता. त्याचा शार्प शूटर अमीराजादा नवाब खानने ही हत्या केली होती. त्यामुळे दाऊदने करीम लालाला मारण्याचं काम शेट्टी गँगला दिलं. हे काम पूर्ण झालं नाही; पण शेट्टी दाऊदचा खास असलेल्या छोटा शकीलच्या जवळ गेला. शेट्टी, छोटा राजन आणि संजय यांनी बडा राजनला मारणाऱ्या अब्दुल कुंजूला 1985मध्ये एका क्रिकेट मॅचवेळी ठार केलं. त्यानंतर शेट्टीने गँगस्टर सफालिका आणि बारक्या नलावडे यांना मारलं. त्यानंतर छोटा राजनच्या सांगण्यावरून गँगस्टर किम बहादूर थापाला शेट्टीने मारलं. वाचा - अन् मामा-भाच्याचं हादरवणारं कांड! भंडाऱ्यातील जळालेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकलले साधू शेट्टीनेही 1992मध्ये मुंबई सोडून दक्षिण कन्नड गाठलं. तिथे तो शांतपणे राहत होता; मात्र मंगलोरमध्ये एका लग्नावेळी जेवणावरून झालेल्या वादावादीत साधू शेट्टीने डाकू नागराज शेट्टी उर्फ मणी नागूच्या पायावर गोळी मारली. त्यामुळे साधू शेट्टीला टाडाअंतर्गत 5 वर्षांचा तुरुंगवास झाला. तुरुंगात असतानाही त्याच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. 1993मध्ये शेट्टी आणि त्याचे साथीदार ललित सिंह ठाकूर, विक्की आणि अशोक राजपूत यांचं नाव अशोक घाटकोपर याच्या हत्या प्रकरणात होतं. मंगलोरमध्ये काँग्रेस नेते अँथनीच्या हत्येतही शेट्टीचं नाव होतं. दरम्यान, 1996मध्ये शेट्टीवर मुंबईच्या सेशन कोर्टात जीवघेणा हल्ला झाला. त्यात वाचलेल्या शेट्टीनं पोलिसांकडे संरक्षण मागितलं होतं. साधू शेट्टीने राजकारणातही प्रवेश केला. तुरुंगात असतानाच त्यानं कोप विधानसभा क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढवली. त्यात तो हरला; मात्र सुटल्यानंतर तुलुनाडा सेना नावाने त्याने एक पक्ष स्थापन केला. त्याच्या गावातून तो मुंबईतला त्याचा वसुलीचा धंदा चालवत होता. मुंबई-कर्नाटक-मुंबई असा शेट्टीचा प्रवास सुरू होता. कारवारचे आमदार वसंत यांच्या हत्येतला प्रमुख आरोपी दिलीप नाईक याच्या अटकेनंतर 2000 साली साधू शेट्टी मुंबईतून पळाला. नाईकने शेट्टीलाच हत्येची सुपारी दिल्याचा आरोप होता. क्राइम ब्रँचचे वरिष्ठ इन्स्पेक्टर आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळस्कर यांच्याकडून अखेर तो 2002मध्ये एका एन्काउंटरमध्ये मारला गेला. प्रेमा नावाच्या महिलेशी शेट्टीने लग्न केल्याचं बोललं जात होतं. मुंबईत वेटर म्हणून काम करणारा एक मुलगा डॉन बनून अखेर मारला गेला.