नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 21 एप्रिल : भंडारा जिल्हाच्या लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गडेगाव येथील वनविभागाच्या लाकूड आगारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. ही घटना 14 एप्रिल रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मृताची ओळख पटविण्यास तसेच आरोपींचा शोध घेण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. मो. तन्वीर अब्दुल रज्जाक शाह (वय 24, रा. शांतीनगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे. तर अतिक लातिफ शेख (वय, 29, रा. शांतीनगर, नागपूर) आणि फैजन परवेझ खान (वय 18, रा. विहाड ता. हिंगणा) अशी आरोपींची नावे आहेत. जुन्या वादातून अतिक शेख आणि फैजन खान यांनी त्याचा खून करून मृतदेह जाळल्याची कबुली दिली. नात्यात मामा व भाचा असणाऱ्या दोघाही आरोपीला भंडारा पोलिसांनी गजाआड केले आहे. अज्ञात मृत व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बेपत्ता व्यक्तीची माहिती आयसीजेएस प्रणालीद्वारे काढण्यात आली. यात मो. तन्वीर अब्दुल रज्जाक हा 6 एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे समजले. पोलिसांनी नातेवाईक आणि मित्रांची सखोल चौकशी केली असता यावेळी मृत तन्वीरचा अतिक शेखसोबत वाद झाल्याचे समजले. यानंतर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबूली दिली आहे. मृत तन्वीर आणि त्याचा भाऊ यांचा आतिफशी 2017 पासूनचा जुनाच वाद होता. दरम्यान, रमजानच्या पहिलाच रोजा असताना त्यांच्यात हातापायी झाली होती. यावरून दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले होते. आपण त्याचा काटा न काढल्यास आपल्या जीवाला धोका आहे, हे असे आतिफला वाटत होते. त्यामुळे त्याने आपला भाचा फैजानच्या मदतीने तन्वीरचा काटा काढला. त्याने माफी मागून फिरण्याच्या बहाण्याने कारने तन्वीरला घेऊन आतिक निघाला. भाच्यालाही सोबत घेतले. तिघेही कारने लाखनीकडे जाणाऱ्या जंगलाच्या रस्त्यावर पोहोचले. तेथे त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. यात आतिफने फैजानच्या मदतीने ओढणीने गळा आवळून आणि गळ्यावर चाकूने घाव घालून त्याला ठार मारले. तसेच गाडीतील डिझेलने मृतदेहाला आग लावून ते पसार झाले होते. याप्रकरणी आरोपी मामा-भाच्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.