मुंबई, 28 जानेवारी: कोविड-19 महामारीपासून जगभरात 'वर्क फ्रॉम होम'चं कर्ल्चर मोठ्या प्रमाणात रुळलं आहे. महामारीचा प्रभाव कमी झाला असला तरी अजूनही जगभरातील कोट्यवधी कर्मचारी आपल्या घरात बसून काम करत आहेत. काही कर्मचारी तर मायदेशात राहून परदेशातील कंपन्यांसाठी काम करत आहेत. 'वर्क फ्रॉम होम'चे काही फायदे आणि तोटे आता दिसू लागले आहेत. 'वर्क फ्रॉम होम'मुळे घरापासून ऑफिसपर्यंतच्या प्रवासाचा वेळ वाचतो. मात्र, घरून काम करणाऱ्या काही कर्मचार्यांना दैनंदिन कामाच्या वेळेपेक्षा खूप जास्त वेळ काम करावं लागतं. त्यामुळे त्यांचा घरून काम करून तोटा होत आहे. पण, काही कर्मचारी असे आहेत, जे वर्क फ्रॉम होमचा फायदा घेऊन हलगर्जीपणा करताना दिसतात. अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ब्रिटिश कोलंबियामधील एका कंपनीनं एक सॉफ्टवेअर विकसित केलं आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीनं कंपनीनं एका महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करत तिला नोकरीवरून काढून टाकलं आहे. 'इंडिया टुडे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
खाकी वर्दीतील माणुसकी! 5 वर्षीय बलात्कार पीडितेसाठी उभारला निधी; शाळेचीही केली व्यवस्था
टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश कोलंबियामधील एका कंपनीनं घरातून 'वर्क फ्रॉम होम' करताना वेळ वाया घालवणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकलं आहे. कार्ली बेस असं या महिलेचं नाव आहे. शिवाय, काम करताना वेळ वाया घालवल्याबद्दल तिला तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर न्यायालयानं कंपनीच्या बाजूनं निर्णय दिला आहे. टाइमकॅम्प नावाचं सॉफ्टवेअर वापरून या महिलेवर कंपनीने कारवाई केली होती. हे सॉफ्टवेअर घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अॅक्टिव्हिटींचा मागोवा घेतं. ब्रिटिश कोलंबियामध्ये अकाउंटंट म्हणून काम करणारी कार्ली बहुतेकवेळा कामापासून दूर असल्याचं सॉफ्टवेअरनं ट्रॅक केलं होतं. त्यामुळे तिला नोकरीतून ताबडतोब काढून टाकण्यात आलं.
कार्ली बेसला कामावरून काढून टाकल्यानंतर तिनं असा दावा केला की, तिच्या कंपनीनं तिला कोणतीही सूचना न देता काढून टाकलं आहे. त्यामुळे कंपनीने तिचा शिल्लक पगार आणि भरपाई अशी एकूण सुमारे 3.03 लाख रुपयांचे तिला द्यावेत. मात्र, कंपनीने उलट तिच्याच कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कार्लीनं कामाच्या वेळेत कामचुकारपणा केल्याचा दावा कंपनीनं केला आहे. कंपनीने म्हटलं आहे की, या महिलेच्या नावे 50 तासांपेक्षा जास्त वेळ काम केल्याची नोंद आहे. पण, प्रत्यक्षात तिनं हा सर्व वेळ कामासाठी वापरलेला नाही.
गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधत असाल तर सावधान! होऊ शकते फसवणूक
कंपनीनं केलेल्या आरोपांचं कार्ली बेसनं खंडन केलं आहे. ती म्हणाली, "सॉफ्टवेअरनं माझ्या कामाचा वेळ आणि वैयक्तिक वेळ यातील फरक अचूकपणे ओळखलेला नाही." पण, कंपनीनं तिचा दावा फेटाळून लावत सॉफ्टवेअरची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. त्यानंतर न्यायाधीशांनी महिलेला नुकसानभरपाई म्हणून कंपनीत तीन लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Career, Career opportunities, Job, Job alert, Work from home