1-2 नव्हे तब्बल 15 मराठी उमेदवार अव्वल
मुंबई, 23 मे: UPSC परीक्षा 2022 आणि मुलाखती दिलेल्या उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर केला आहे. मुलाखतीला उपस्थित असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. निकालासोबतच टॉपर्सची यादीही जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे UPSC मुलाखत संपल्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी निकाल जाहीर झाला आहे. मात्र यंदाचा निकाल महाराष्ट्राची मान उंचावणारा ठरला आहे. UPSC परीक्षा 2022 चा निकाल हा महाराष्ट्रासाठी खास आहे. कारण यंदा 1-2 नव्हे तब्बल 15 मराठी उमेदवार हे परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच हे सर्व उमेदवार आता IAS, IPS किंवा इतर सिव्हिल सर्व्हिस अधिकारी होणार आहेत. या सर्वांमध्ये ठाण्याची कश्मिरा संखे हिने संपूर्ण देशातून 25 वा रँक मिळवला आहे. तर राज्यातील इतर चौदा उमेदवार हे सिलेक्शनच्या यादीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही गर्वाची गोष्ट आहे. नक्की कोण आहेत हे उमेदवार बघूया. महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांची यादी कश्मिरा संखे - AIR 25 वसंत दाभोळकर - AIR 76 प्रतिक जराड - AIR 122 जान्हवी साठे - AIR 127 गौरव कायंदे-पाटील - AIR 146 ऋषिकेश शिंदे - AIR 183 अमर राऊत - AIR 277 अभिषेक दुधाळ - AIR 278 श्रुतिषा पाताडे - AIR 281 स्वप्नील पवार - AIR 287 अनिकेत हिरडे - AIR 349 संकेत गरुड - AIR 370 ओमकार गुंडगे - AIR 380 परमानंद दराडे - AIR 393 मंगेश खिलारी - AIR 396 UPSC ने जाहीर केलेल्या निकालानुसार, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट ‘A’ आणि गट ‘B’ मध्ये नियुक्तीसाठी एकूण 933 उमेदवार यशस्वी घोषित झाले आहेत. 933 यशस्वी उमेदवारांपैकी 345 सामान्य श्रेणीतील, 99 EWS, 263 OBC, 154 SC, 72 ST प्रवर्गातील आहेत. या परीक्षेद्वारे IAS साठी 180, IFS साठी 38, IPS साठी 200, केंद्रीय सेवा गट ‘A’ साठी 473 आणि गट ‘B’ सेवांसाठी 131 पदे भरण्यात आली आहेत. तर देशात इशिता किशोरने यंदा अव्वल स्थान पटकावले आहे. यानंतर गरिमा लोहियाला दुसरे तर उमा हर्थीला तिसरे स्थान मिळाले आहे. UPSC कडून टॉपर विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.