यूआयडीएआयमध्ये तीन पदांसाठी भरती
नवी दिल्ली, 22 मे : केंद्र सरकारच्या द युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयमध्ये तीन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यूआयडीएआयने संचालक, संचालक (तंत्रज्ञान) या पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही पदं प्रतिनियुक्ती (परराष्ट्र सेवा मुदतीच्या आधारावर) भरली जाणार आहे. यूआयडीएआयने भरती प्रक्रियेसंदर्भात 16 मे 2023 रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यासाठीचे निकष सविस्तर जाणून घेऊया. यूआयडीएआयमध्ये संचालक आणि संचालक (तंत्रज्ञान) या पदांसाठी (पे लेव्हल 13) भरती प्रक्रिया राबवत आहे. या प्रक्रियेत संचालक पदाच्या दोन आणि संचालक (तंत्रज्ञान) पदाची एक अशा तीन रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ही तीनही पदं प्रतिनियुक्तीवर असतील. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 जुलै 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. या प्रतिनियुक्तीची (एफएसटीबी) सामान्य मुदत पाच वर्षं राहील. निवड झालेल्या उमेदवारांचं पोस्टिंग नवी दिल्ली येथील यूआयडीएआयचं मुख्यालय आणि हरियाणातील मानेसर (एमडीसी) येथे केली जाणार आहे. यूआयडीएआयच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, संचालक पदासाठी इच्छुक उमेदवार केंद्र सरकारच्या पॅरेंट केडर विभागात नियमित आणि समकक्ष पदावरील अधिकारी असावा. त्याने पे मॅट्रिक्स लेव्हल 12 मध्ये तीन वर्ष नियमित सेवा केलेली असावी. राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेशातील सरकार/ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/ स्वायत्त संस्थांमधील अधिकारी असावा. संबंधित ग्रेडवर नियमित पोस्टवर कार्यरत असणाऱ्या अनुभवी उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. संचालक (तंत्रज्ञान) पदासाठी इच्छुक उमेदवार सरकारच्या पॅरेंट केडर विभागात नियमित आणि समकक्ष पदावरील अधिकारी असावा. त्याने पे मॅट्रिक्स लेव्हल 12 मध्ये तीन वर्ष नियमित सेवा केलेली असावी. राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेशातील सरकार/ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/ स्वायत्त संस्थांमधील अधिकारी असावा. संबंधित ग्रेडवर नियमित पोस्टवर कार्यरत असणाऱ्या अनुभवी उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल. तसंच उमेदवाराने चार वर्षांची अभियांत्रिकी पदवी मिळवलेली असावी अथवा त्याने पदव्युत्तर पदवी किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विषयात पदवी मिळवलेली असावी. अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार पात्र उमेदवाराचं वय 56 वर्षांपेक्षा कमी असावं. तसंच पाच वर्षं सेवा पूर्ण झालेले केंद्र सरकारचे कर्मचारीदेखील या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या पात्र आणि इच्छुक अधिकाऱ्यांनी मागील पाच वर्षांच्या एसीआर/एपीएआरच्या फोटो कॉपीसह अर्ज करावा. संचालक आणि संचालक (तंत्रज्ञान) या पदांवर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पे मॅट्रिक्स स्तरानुसार मासिक वेतन दिलं जाईल. यात संचालक आणि संचालक (तंत्रज्ञान) पदावर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना पे मॅट्रिक्स लेव्हल 13 नुसार दरमहा वेतन दिलं जाईल. वाचा - महिन्याचा 40,000 रुपये पगार अन् थेट वन विभागात नोकरी; घाई करा; इथे पाठवा अर्ज यूआयडीएआयच्या अधिसूचनेनुसार, संचालक आणि संचालक (तंत्रज्ञान) या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रत्यक्ष आणि वैयक्तिक संवादाच्या माध्यमातून केली जाईल. पात्रता निकषांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. केवळ शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनाच इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाणार आहे. पॅरेंट केडर किंवा विभागात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना निवडीत प्राधान्य दिले जाऊ शकते. प्रतिनियुक्तीसंदर्भातील अटी, वेतन आणि भत्त्यांसह, रजा वगळता कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (डीओपीटी) कार्यालय मेमोरँडम क्रमांक 6/08/2009 - आस्थापना (वेतन -II) दिनांक 17 जून 2010 मध्ये दिलेल्या तरतुदींनुसार तसेच या संदर्भात वेळोवेळी जारी केलेले इतर आदेश/ मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील. प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांची रजा यूआयडीएआयच्या रजेच्या नियमाद्वारे नियंत्रित केली जाईल. प्रतिनियुक्तीचा कालावधी आणि इतर अटी व शर्ती : प्रतिनियुक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल. संबंधित विभागाच्या धोरण, नियमांनुसार एखाद्या अधिकाऱ्याला कमी कालावधीची सूट मिळू शकेल. पण हा कालावधी तीन वर्षांपेक्षा कमी नसेल. यूआयडीएआयमधील अधिकारी सेवेच्या सामान्य अटी व शर्ती यूआयडीएआय ( अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती) विनियम 2020 आणि या संदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियंत्रित केल्या जातील. संचालक आणि संचालक (तंत्रज्ञान) या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी या पदासाठीचा विहित अर्ज नमून्यामध्ये (परिशिष्ट -I), मागील पाच वर्षांचा वार्षिक गोपनीय अहवाल/ वार्षिक कामगिरी अहवालाच्या फोटो कॉपीसह यूआयडीएआयकडे अर्ज करावा. इच्छुक उमेदवार पाच जून 2023 पर्यंत त्यांचे आगाऊ अर्ज सबमिट करू शकतात. केडर कंट्रोलिंग अथॉरिटीज/ विभाग प्रमुखांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे विहित अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 19 जून 2023 पर्यंत सादर करावेत, जेणेकरून त्यांच्या प्रतिनियुक्तीसाठी सध्याच्या सेवेतून त्यांना लगेच मुक्त करता येईल. वाचा - बँकेत जॉब हवाय ना? मग ‘या’ सहकारी बँकेत तब्बल 50 जागांसाठी करा अप्लाय यूआयडीएआयच्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांसह त्यांचा अर्ज योग्य चॅनेलमधून करावा. उमेदवारांनी विहित प्रोफॉर्मा-परिशिष्ट -I मध्ये नमूद केल्यानुसार अर्जाची साक्षांकित प्रत, नियंत्रक प्रधिकरणाने जारी केलेले केडर क्लिअरन्स सर्टिफिकेट, परिशिष्ट -II नुसार गेल्या दहा वर्षात संबंधित अधिकाऱ्यावर आकारण्यात आलेल्या मोठ्या किंवा किरकोळ दंडाचा तपशील, दक्षता मंजुरी/ इंटिग्रिटी सर्टिफिकेट अर्ज करतेवेळी सादर करावे. तसेच अर्जासोबत अवर सचिव किंवा समतुल्य पातळीवरील अधिकाऱ्याने प्रमाणित केलेल्या गेल्या पाच वर्षाच्या एसीआर/एपीएआर फोटोकॉपीज सादर कराव्यात.