मोहम्मद अली शिहाब
मुंबई, 11 ऑक्टोबर: आयुष्यातील छोट्या-मोठ्या अपयशांना घाबरणाऱ्या लोकांसाठी केरळचे रहिवासी असलेल्या मोहम्मद अली शिहाब यांची जीवनकथा खूप प्रेरणादायी ठरू शकते. लहानपणापासून त्यांनी खूप संघर्ष केला आहे. मात्र ते कधीही कोणत्याही संकटाला घाबरले नाहीत आणि आपलं लक्ष्य साध्य करण्याकडे वाटचाल करत राहिले.
मोहम्मद अली शिहाब हे मूळचे केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील एडवन्नापारा या गावचे आहेत. त्यांचा जन्म 15 मार्च 1980 रोजी कोरोत अली आणि फातिमा यांच्या घरी झाला. शिहाब यांना एक मोठा भाऊ, एक मोठी बहीण आणि दोन लहान बहिणी आहेत. शिहाब यांचं बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेलं.
वडिलांसोबत पानं विकली
शिहाब लहानपणी वडील कोरोत अली यांच्यासोबत बांबूच्या टोपल्या आणि पानं विकायचे. 31 मार्च 1991 रोजी शिहाब यांच्या वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शिहाबच्या आईच्या खांद्यांवर आली. त्यांची आई फारशी शिकलेली नव्हती आणि ती आपल्या पाच मुलांचं संगोपन नीट करू शकत नव्हती.
ग्रॅज्युएट्ससाठी महिन्याचा तब्बल दीड लाख रुपये पगार; अर्जाची शेवटची तारीख
आई असूनही झाले अनाथ
पतीच्या मृत्युनंतर केवळ दोन महिन्यांनी फातिमा यांनी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा शिहाब, 8 वर्षांची मुलगी सौहराबी आणि 5 वर्षांची मुलगी नसीबा यांना कोझिकोड येथील कुट्टीकट्टूर मुस्लिम अनाथाश्रमात पाठवलं. तिन्ही भावंडं लहान वयातच घरापासून दुरावली गेली. शिहाब यांनी अनाथाश्रमात राहून बारावी आणि प्री-डिग्रीचं शिक्षण घेतलं.
10 वर्षांनी परतले घरी
एक दशक म्हणजे 10 वर्षे अनाथाश्रमात राहिल्यानंतर शिहाब घरी परतले. त्यानंतर त्यांनी डिस्टन्स मोडमध्ये अभ्यास सुरू केला. शिहाब आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांसाठी 21 परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 2004 मध्ये त्यांनी शिपाई, त्यानंतर रेल्वे तिकीट परीक्षक आणि जेल वॉर्डन म्हणूनही काम केलंय.
‘ही’ आहे जगातील सगळ्यात भयावह नोकरी; जॉब प्रोफाइल वाचून तुमचाही उडेल थरकाप
तिसऱ्या प्रयत्नात झाले IAS
इतर नोकऱ्या करत असताना शिहाब यूपीएससी परीक्षेची तयारी करत होते. याच तयारीदरम्यान मोहम्मद अली शिहाब यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे पहिल्या दोन प्रयत्नांत त्यांना यश आलं नाही. पण त्यांनी हार न मानता आपली तयारी चालू ठेवली. 2011 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात शिहाब यांनी UPSC परीक्षा पास केली. त्यांनी ऑल इंडिया लेव्हलवर 226 वी रँक मिळवली होती. यूपीएससीच्या मुलाखतीसाठी त्यांच्यासाठी ट्रान्सलेटर नेमण्यात आला होता.
लहान लहान अडचणींमुळे खचून जाणाऱ्या आणि काम अर्धवट सोडणाऱ्या लोकांसाठी मोहम्मद अली शिबाह यांची ही कहाणी खरंच खूप प्रेरणादायी आहे.