'मॅकडोनाल्ड्स इंडिया'मध्ये लवकरच भरती
मुंबई, 13 डिसेंबर: सध्या जगभरातल्या अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केला आहे. विशेषत: ट्विटर, मेटा आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी मोठी कर्मचारी कपात केली आहे. असं असताना फूड इंडस्ट्रीमध्ये मात्र नवीन नोकऱ्यांची संधी खुली झाली आहे. क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट असलेल्या ‘मॅकडोनाल्ड्स इंडिया’ने पाच हजार नवीन कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (12 डिसेंबर) कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या तीन वर्षांत उत्तर आणि पूर्व भारतात 300 रेस्टॉरंट्सचा टप्पा ओलांडण्याचं उद्दिष्ट कंपनीने ठेवलं आहे. या प्रदेशातल्या आपल्या आउटलेट्सची संख्या दुप्पट करण्यासाठी नवीन पाच हजार जणांना कामावर घेतलं जाणार आहे. ‘द टेलिग्राफ’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘मॅकडोनाल्ड इंडिया’चे (उत्तर आणि पूर्व) व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाले, की कंपनी वृद्धीचा वेग वाढवण्याच्या विचारात आहे. त्यासाठी उत्तर आणि पूर्व भारतातल्या राज्यांमध्ये नेटवर्क विस्तारलं जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून मॅकडोनाल्ड्सने गुवाहाटीत भारतातलं सर्वांत मोठं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. 6700 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या या रेस्टॉरंटमध्ये एकाच वेळी 220 ग्राहकांना सेवा देण्याची क्षमता आहे. एक चूक आणि संपूर्ण करिअर उद्ध्वस्त; पोलीस भरतीसाठी ‘ते’ इंजेक्शन घेण्याचा विचारही करू नका; अन्यथा… गुवाहाटीमधल्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनप्रसंगी राजीव रंजन कंपनीच्या भविष्यातल्या नियोजनाबद्दल बोलत होते. मॅकडोनाल्डच्या पूर्वीच्या भागीदारासोबत कायदेशीर बाबी निकाली निघाल्या आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “आमच्यामागे अनेक समस्या आहेत; पण आम्ही त्यावर मात करून व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.” कर्मचार्यांची संख्या आणि भविष्यातल्या नियुक्ती योजनांबद्दल विचारलं असता, ते म्हणाले, “आमच्याकडे सध्या पाच हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. जसजसा आम्ही विस्तार करत आहोत तसतशी आम्ही कर्मचारी संख्या वाढवू. येत्या तीन वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट होईल.” गुवाहाटीमधल्या नवीन आउटलेटबद्दल बोलताना रंजन म्हणाले, की ईशान्य भारतातलं हे मॅकडोनाल्डचं सर्वांत मोठं रेस्टॉरंट आहे. गुवाहाटी हे ईशान्य भारताचं प्रवेशद्वार असल्यानं भविष्यातल्या विस्ताराच्या शक्यतांसाठी एक मोक्याचं ठिकाण आहे. ईशान्य भारतात आणखी आउटलेट्स उघडण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे; मात्र सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. Maharashtra Talathi Bharti: सरकारी नोकरी हवीये ना? मग आतापासुनच लागा तयारीला; हा घ्या संपूर्ण Syllabus यूएस फास्ट फूड चेन असलेल्या मॅकडोनाल्ड्सने 2020मध्ये एमएमजी ग्रुपचे अध्यक्ष संजीव अग्रवाल यांची उत्तर आणि पूर्व भारतात आउटलेट चालवण्यासाठी नवीन भागीदार म्हणून निवड केली होती. त्यांनी 50 टक्के भागीदारीसाठी या बहुराष्ट्रीय दिग्गज कंपनीसोबत दीर्घ काळ कायदेशीर वाद घातला होता. सध्या मॅकडोनाल्ड्स भारतामध्ये दोन प्रमुख फ्रँचायझीजच्या मदतीने कारभार करत आहे. उत्तर व पूर्व भारतासाठी संजीव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालचा एमएमजी ग्रुप आणि पश्चिम व दक्षिण भारतासाठी बी. एल. जाटिया यांच्या नेतृत्वाखालचा वेस्टलाइफ ग्रुप फ्रँचायझी आहे. राजीव रंजन म्हणाले, की कंपनी सध्या उत्तर आणि पूर्व भारतात 156 रेस्टॉरंट्स चालवते. पुढील तीन वर्षांत आउटलेट्सची संख्या दुप्पट करण्याचा कंपनीचा विचार आहे.