अग्निवीर भरती अर्जासाठी शेवटची संधी
नवी दिल्ली, 4 एप्रिल : भारतीय हवाई दलात गेल्या काही दिवसांपासून अग्निवीर उमेदवार भरती सुरू होती. आज (4 एप्रिल) अर्ज स्वीकृतीचा शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज भरलेला नाही, ते IAF च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरू शकतात. या उमेदवार भरतीबाबतची पात्रता, शुल्क व अर्ज कसा भरावा याबाबत माहिती घेऊ या. देशासाठी सेवा करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते; मात्र सुरुवात कशी करावी, याबाबत त्यांना माहिती नसते. लष्करात भरती होण्यासाठी अग्निवीर मोहीम सुरू करण्यात आली. विशेषतः भारतीय लष्करात अल्प काळासाठी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही योजना उपयुक्त आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. आज (4 एप्रिल) हा हवाई दलातील अग्विनीर भरतीचा शेवटचा दिवस आहे. भारतीय हवाई दलात अग्निवीर भरती प्रक्रिया 17 मार्च 2023 पासून सुरू झाली होती. ही प्रक्रिया 31 मार्चपर्यंतच सुरू असणार होती; मात्र इच्छुक उमेदवारांना आणखी 4 दिवस वाढवून देण्यात आले. या भरतीबाबत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना agnipathvayu.cdac.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. असा करा अर्ज - agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जा. - होमपेजवर उमेदवार लॉग इन हे बटण दाबा. - ‘रजिस्टर करण्यासाठी इथे क्लिक करा’ हे बटण दाबा. - तुमची माहिती भरा व नोंदणी करा. - त्यानंतर लॉग इन करून अर्ज भरा व कागदपत्रं जोडा. - शुल्क भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा. - अर्ज डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा. अर्जाचं शुल्क अग्निवीर योजनेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत 250 रुपयांचं शुल्क भरावं लागेल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरता येईल. वाचा - भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; शेकडो पदांसाठी भरती सुरू! पात्रतेचे निकष या उमेदवार भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त नसावं, अशी त्यासाठीची अट आहे. म्हणजेच 26 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 या कालावधीत जन्मलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत. या उमेदवारांच्या उंचीबाबतही काही निकष आहेत. पुरुष उमेदवारांची उंची कमीत कमी 152.5 सेंटिमीटर, तर महिला उमेदवारांची उंची कमीत कमी 152 सेंटिमीटर असावी. शैक्षणिक पात्रता या अग्निवीर भरतीसाठी 20 मे 2023पासून लेखी परीक्षेला सुरुवात होईल. गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी हे विषय घेतलेल्या उमेदवारांना 12वीमध्ये किमान 50 टक्के गुण असले पाहिजेत. तसंच उमेदवारांकडे 3 वर्षांचा इंजिनीअरिंगचा डिप्लोमाही असणं गरजेचं आहे. निवड प्रक्रिया हवाई दलाच्या अग्निपथ योजनेतल्या भरतीसाठी लेखी परीक्षा, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट (PET), फिजिकल मेजरमेंट टेस्ट (PMT) या परीक्षा द्याव्या लागतील. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व कागदपत्रांची पडताळणी होईल व अंतिम निवड केली जाईल. अग्निवीर म्हणून हवाई दलात भरती होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.