मुंबई, 31 मार्च : भारतातील रेल्वे सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहचलेली आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. रेल्वे वाहतुकीचा हा पसारा सांभाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची गरज भासते. त्यासाठी मंत्रालयातर्फे वेळोवेळी नोकरभरती केली जाते. आताही भारतीय रेल्वे विभागातर्फे सहाय्यक लोको पायलट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भारतीय रेल्वे भरती 2023 च्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण 238 रिक्त जागा आहेत. निवडलेल्या उमेदवाराला वेतन मॅट्रिक्स 'लेव्हल 2' प्रमाणे मासिक वेतन दिलं जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 7 एप्रिल 2023 पासून उपलब्ध होतील.
पोस्टाचं नाव आणि संख्या: भारतीय रेल्वे भरती 2023 च्या अधिसूचनेनुसार, असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण 234 रिक्त जागा आहेत.
वयोमर्यादा: असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचं वय 1 जुलै 2023 रोजी 43 वर्षांपेक्षा जास्त नसावं. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचं वय 45 आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचं वय 47 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
पे-स्केल: असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील 'लेव्हल 2' प्रमाणे मासिक वेतन दिलं जाईल
पात्रता: असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानं, (i) फिटर (ii) इलेक्ट्रिशियन (iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (iv) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (v) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (vi) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (vii) मेकॅनिक (मोटर वाहन) ( viii) वायरमन (ix) ट्रॅक्टर मेकॅनिक (x) आर्मेचर आणि कॉइल वाइंडर (xi) मेकॅनिक (डिझेल) (xii) हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.
किंवा
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
बोर्ड लेटरला अनुसरून 20/08/2001, 28/08/2014 आणि 30/09/2015 रोजीच्या RBE क्रमांक 162/2001मध्ये रेल्वे बोर्डाने दिलेल्या सूचनांच्या अनुसार या पदांसाठी सूचित केलेल्या पात्रतेत बसणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विविध शाखांचं एकत्रितपणे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही या पदांसाठी अर्ज करता येऊ शकतो.
निवड प्रक्रिया: संगणक-आधारित चाचणी/लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर अॅप्टिट्युड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट घेतली जाईल. CBT/ लेखी परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असतील. लेखी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येक प्रश्नासाठी वाटप केलेल्या गुणांपैकी 1/3 गुण वजा केले जातील. इतर तपशील निवडलेल्या उमेदवारांना योग्य वेळी समजावून सांगितले जातील.
अर्ज कसा करावा: भारतीय रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 6 मे 2023 आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Job Alert