फाईल फोटो
मुंबई, 17 जुलै : पोलीस सेवेमध्ये अनेक पदांची भरती यूपीएससी किंवा पीसीएस परीक्षेमार्फत केली जाते. यात डीएसपी हे एक महत्त्वाचं पद असतं. डीएसपी अर्थात डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजेच पोलीस उपअधीक्षक हे पद. या पदावरच्या व्यक्तींना अनेक सेवा व लाभ मिळतात. त्यांना अनेक महत्त्वाच्या जबबादाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यांना उत्तम वेतनही मिळतं. पोलीस उपअधीक्षक बनण्यासाठी काय पात्रता लागते, त्यांना किती वेतन मिळतं, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात याबद्दल आणि या पदाच्या अनुषंगाने इतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊ या. भारतात अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये पोलीस दलाचं नेतृत्व वरिष्ठ पोलीस अधीक्षक करतात. छोट्या जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक हे काम पाहतात. त्याव्यतिरिक्त पोलीस उपअधीक्षक हे एक महत्त्वाचं पद पोलीस सेवेत असतं. हे राज्य स्तरावरचे पोलीस अधिकारी असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी रोखण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. वेतन - प्रशासकीय सेवा परीक्षांद्वारे पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती केली जाते. प्रत्येक राज्यात या पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. या पदासाठी 53,100 ते 1,67,800 रुपयांचं वेतनमान आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार या पदासाठी वेतन दिलं जातं. सर्वसाधारणपणे पोलीस उपअधीक्षक पदासाठी 73,915 रुपये वेतन हातात मिळू शकतं. पोलीस उपअधीक्षक हे पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली काम पाहतात. पोलीस विभागातल्या सगळ्या कामांवर लक्ष ठेवण्याचं एक काम त्यांच्याकडे असतं. गुन्हे रोखणं, पोलीस स्टेशनमधलं प्रशासन आणि व्यवस्थापन, तपासावर लक्ष ठेवणं या सगळ्या जबाबदाऱ्या पोलीस उपअधीक्षकांना पार पाडाव्या लागतात. जबाबदाऱ्या - जिल्ह्याचा सर्वोच्च गुप्तचर अधिकारी म्हणून काम करताना डीएसपी त्यांच्या खालच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती गोळा करतात आणि वरिष्ठांना त्याचे अहवाल पाठवतात. राजकीय रॅली, कार्यक्रमांमध्ये जमावावर नियंत्रण ठेवण्याचं कामही त्यांच्याकडे असतं. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक नव्या पद्धती विकसित करतात. सगळ्या गोष्टींवर देखरेख ठेवतात. समाजामध्ये तेढ उत्पन्न होऊ नये, नागरिकांमध्ये चांगले संबंध राहावेत यासाठी ते प्रयत्नशील असतात. नागरिक कायद्याचं पालन करत आहेत का हेही पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. पात्रता - डीएसपी बनण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिक असावा लागतो. म्हणजेच त्याचा जन्म भारतात झालेला असावा. वयोमर्यादा 21-30 वर्षं (प्रत्येक राज्यानुसार वयोमर्यादा बदलते) इतकी असते. एससी व एसटी गटासाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत आहे. उमेदवारानं कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. डीएसपी होण्यासाठी, कोणत्याही उमेदवारांना यूपीएससी किंवा पीसीएस (प्रांतीय नागरी सेवा) परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. यानंतर त्यांच्या रँकच्या आधारे त्यांची डीएसपी पदासाठी निवड केली जाते; पण डीएसपी होण्याचे आणखी काही मार्ग असू शकतात. खेळात प्रवीण असलेल्यांची डीएसपी पदावर निवड होऊ शकते. काही वेळा आयपीएस अधिकाऱ्याचीही पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) किंवा सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. डीएसपी या पदासाठी वेतनासह उमेदवारांना महिंद्रा बोलेरो/टोयोटा इनोव्हासारखी अधिकृत गाडी, शासकीय निवासस्थानात 24 तास काम करणारे सुरक्षारक्षक असतात. एक वैयक्तिक आचारी आणि घरकाम करणारा, सुरक्षेसाठी तीन PSO (वैयक्तिक सुरक्षारक्षक) पोलीस उपअधीक्षकांना दिले जातात.