बिहार पोलीस दलात काम करण्याची सुवर्ण संधी; या पदासाठी राबवली जाणार भरती प्रक्रिया
मुंबई, 12 जून : पोलीस दलात भरती होण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. त्यासाठी तरुण कठोर मेहनत घेत असतात. शारीरिक आणि शैक्षणिक निकषांमध्ये बसण्यासाठी व्यायामासह अभ्यासाला महत्त्व देतात. तुम्ही देखील पोलीस दलात सामील होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण बिहार पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबलची 21 हजारांवर पदं भरली जाणार आहे. बिहार सेंट्रल सिलेक्शन बोर्ड ऑफ कॉन्स्टेबलने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी अर्ज करण्याकरीता उमेदवारांना केवळ एक दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी निश्चित केलेले निकष कोणते ते सविस्तर जाणून घेऊया. बिहार सेंट्रल सिलेक्शन बोर्ड ऑफ कॉन्स्टेबल अर्थात सीएसबीसीने 21,391 पोलीस कॉन्स्टेबल रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याकरिता उमेदवारांना केवळ एका दिवसाची मुदत देण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून, त्यानुसार या पदासाठी इच्छुक उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा किंवा त्याने बिहार राज्य सरकारच्या मदरसा बोर्डाने जारी केलेले मौलवी प्रमाणपत्र मिळवलेले असावे अथवा बिहार राज्य संस्कृत बोर्डाचे शास्त्री प्रमाणपत्र मिळवलेले असावे. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. हे अर्ज शुल्क 675 रुपये असेल. तसेच एसीसी, एसटी प्रवर्ग, महिला आणि ट्रान्सजेन्डर यांच्यासाठी 180 रुपये अर्ज शुल्क असेल. सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; थेट DRDO मध्ये जॉब ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? बघा बिहार सेंट्रल सिलेक्शन बोर्ड ऑफ कॉन्स्टेबलच्या अधिसूचनेनुसार, पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी इच्छुक अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे ते कमाल 25 वर्षादरम्यान असावे. पुरुष उमेदवारांसाठी मागास आणि अत्यंत मागासवर्गीयांकरिता वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे. मागास आणि अत्यंत मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी 18 ते 30 वर्ष अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवार 20 जून रोजी या पदासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 20 जून पर्यंत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार csbc.bih.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जात ऑनलाइन अर्ज करू शकतात.