रेल्वे
मुंबई, 11 मार्च : भारतात रेल्वेचं जाळं भरपूर विस्तारलेलं आहे. केंद्र सरकारमधील रेल्वे मंत्रालयाद्वारे रेल्वेचं संपूर्ण कामकाज सांभाळलं जातं. देशभरात रेल्वेच्या विविध नियुक्त्या केल्या जातात. त्यापैकीच एक पद असतं, विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचं. देशभरातल्या रेल्वेच्या 70 विभागांमध्ये या पदाची नेमणूक होत असते. डीआरएम (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर) अर्थात विभागीय रेल्वे व्यवस्थापक या पदाची नेमणूक कशी होते, या पदासाठी मिळणारा पगार व इतर सुविधा याबाबत माहिती जाणून घेऊया. भारतीय रेल्वेतल्या डीआरएम या पदाचं नाव अनेकांनी या पूर्वी ऐकलं असेल. थोडासा उशीर झाल्यानं गाडी चुकली, तर आपण डीआरएम असायला पाहिजे होतं असं अनेकांना वाटलं असेल. पण रेल्वेतल्या डीआरएमची नेमणूक कशी होते, त्यांना काय सुविधा असतात, याची फारशी कोणाला माहिती नसते. डीआरएम अर्थात डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर असं हे पद असतं. मंत्रालयानं कामकाज सुरळीत चालावं यासाठी रेल्वेची काही विभागांमध्ये विभागणी केली आहे. या विभागांची काही रेल्वे मंडळांमध्ये विभागणी केली. या प्रत्येक रेल्वे मंडळाचं एक मुख्यालय असतं. यानुसार सध्या रेल्वेमध्ये 18 मुख्य विभाग आहेत आणि 70 मंडळं आहेत. या मंडळांमध्ये डीआरएमची नियुक्ती होते. ग्रॅज्युएट उमेदवारांनो, ‘या’ विद्यापीठात नोकरीची मोठी संधी; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक; करा अप्लाय डीआरएमची जबाबदारी डीआरएम अर्थात डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर हा रेल्वेच्या त्या मंडळाचा प्रशासकीय प्रमुख किंवा कार्यकारी अधिकारी असतो. रेल्वेबाबतच्या सगळ्या निर्णयांसाठी तो जबाबदार असतो. ट्रेनच्या रोजच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणं, रेल्वे ट्रॅकची देखभाल, स्टेशनच्या इमारतीची व्यवस्था या सगळ्याची जबाबदारी डीआरएमवर असते. त्या विभागातल्या महाव्यवस्थापकांना अहवाल सादर करावा लागतो. डीआरएमसाठी पात्रता डीआरएम बनण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली पाहिजे. त्यानंतर इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिस एक्झाम (IESE) किंवा प्रशासकीय सेवा परीक्षा द्यावी लागते. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर त्यांच्या गुणांनुसार, भारतीय रेल्वेतल्या ग्रुप ए सर्व्हिसेसमधील (IRSE, IRSME, IRSSE, IRSEE, IRSS, IRTS, IRAS, IRPS) एका पदासाठी निवड केली जाते. तिथे 2 वर्षांच्या प्रशिक्षणानंतर प्रोबेशनल ज्युनिअर स्केल ऑफिसर म्हणून असिस्टंट इंजिनीअर किंवा असिस्टंट पर्सनल ऑफिसर या पदांवर नियुक्त केलं जातं. त्यानंतर 2 वर्षांनी सीनिअर स्केल ऑफिसर म्हणून बढती मिळते. 3 वर्षांनी कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती होते. यानंतर 10 किंवा 15 वर्षांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून बढती मिळते. यानंतर एडीआरएम अर्थात अॅडिशनल डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर हे पद मिळतं. तिथे 4-5 वर्षं काम केल्यावरच डीआरएम पदासाठी तुम्ही पात्र ठरता. डीआरएम पदासाठी ग्रेड पे 10 हजार असून आणि 37,400- 67000 या पे बँड अंतर्गत एकूण 68610 रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळतो. त्यासोबतच घर आणि गाडीची सुविधाही मिळते. डीआरएम हे रेल्वेमधलं उच्च पद आहे. त्यामुळेच त्यांना उत्तम पगार व चांगल्या सुविधा असतात.