महिला बसचालक प्रियंका शर्मा
नवी दिल्ली, 23 डिसेंबर : पतीच्या निधनांनंतर घरची परिस्थिती साधारण असेल तर घर चालवणे कठीण होऊन बसते. त्यातच मुलांची जबाबदारी असेल तर अनेकांना जगणे कठीण होऊन बसते. मात्र, उत्तर प्रदेशातील एका महिलेने आपल्या पतीच्या निधनानंतरही न खचता, न हारता उत्तरप्रदेश राज्य परिवहन बससेवेत पहिली महिला बसचालक होण्याचा मान मिळवला आहे. आता तुम्ही उत्तरप्रदेश राज्य परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करत असाल तर ती बस कोणीतरी महिला चालक चालवत असण्याची शक्यता आहे. कारण राज्याला आता पहिली महिला बसचालक मिळाली आहे. उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (UPSRTC) नियुक्त केलेल्या 26 महिला चालकांपैकी, प्रियांका शर्मा या अनेक संघर्षावर मात करत राज्यातील पहिली सरकारी बस चालक बनल्या आहेत. प्रियांकाच्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, अति मद्यपानामुळे त्यांच्या पतीचा लवकरच मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर दोन मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. चांगल्या संधींसाठी त्या दिल्लीला गेल्या होत्या. सुरुवातीला त्यांना एका कारखान्यात सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली होती. मात्र, नंतर त्यांनी ड्रायव्हर होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रवेशही घेतला. नंतर ड्रायव्हिंग कोर्स करून त्या मुंबईला गेल्या. त्यानंतर बंगाल, आसाम अशा वेगवेगळ्या राज्यांतही त्या गेल्या. हेही वाचा - एकेकाळी रिसेप्शनिस्ट ते आज IPS अधिकारी, अशी आहे पूजा यादवची UPSC जर्नी यापूर्वी प्रियांका ट्रक चालक होत्या. त्या त्यांच्या ट्रकच्या माध्यमातून देशातील विविध राज्यात जायच्या. ट्रक ड्रायव्हर झाल्यानंतर प्रियंका आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नव्हत्या, त्यामुळे मुलांना हॉस्टेलमध्ये पाठवण्यात आले. जेव्हा त्यांची यूपी रोडवेजमध्ये निवड झाली तेव्हा त्यांना यूपीमधील कौशांबी डेपोमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. महिला चालकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. याबाबत प्रियंका म्हणाल्या की, “2020मध्ये योगीजी आणि मोदीजींनी महिला ड्रायव्हर्ससाठी नोकऱ्या काढल्या. मी एक फॉर्मही भरला. मी मे महिन्यात प्रशिक्षण उत्तीर्ण झाले आणि सप्टेंबरमध्ये पोस्टींग झाली. आमचा पगार कमी असला तरी, आम्हाला सरकारचा चांगला पाठिंबा मिळत आहे.”