मशरूमच्या उत्पादनातून लाखो रुपयांची कमाई
जयपूर, 19 फेब्रुवारी : राजस्थानातल्या कोटा शहरातल्या बोरखेडा परिसरात राहणारा 24 वर्षीय यशराज साहू हा तरुण जीवनात नवीन कल्पना घेऊन पुढे जाण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. कृषी क्षेत्रात त्याने अशी कामगिरी केलीय, जी इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. बीएस्सी ॲग्रिकल्चर झालेल्या यशराजने मशरूमच्या बीजोत्पादनातून उत्तम नफा मिळवला आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी येणाऱ्या तरुणांसाठी हे एक यशस्वी उदाहरण तर आहेच, शिवाय शेतकऱ्यांसाठीही खूप उपयुक्त आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर यशराजने काही तरी नवीन करण्याचा विचार केला. सुरुवातीपासूनच त्याचा कल शेतीकडे होता. त्यामुळे त्याने ॲग्रिकल्चर विषयात ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन चालू असतानाच कोटाच्या कृषी विज्ञान केंद्रात यशराजने मशरूमचं बियाणं तयार करण्याची पद्धत शिकून घेतली. पदवी पूर्ण केल्यानंतर घरीच त्याने मशरूमच्या बियाण्याचं उत्पादन करण्यास सुरुवात केली. आता हे बियाणं विकून तो वर्षाला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहे. दोन वर्षांपूर्वी घरीच बनवली लॅब यशराज साहू सांगतो, ‘2021 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर मी घरीच मशरूमच्या बियाण्याच्या निर्मितीसाठी लॅब सुरू केली. ही लॅब उभारण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च आला. लॅब सुरू केल्यानंतर मशरूमच्या बियाण्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना 80 ते 100 रुपये किलो दरानं बियाणं विकलं जातं. पहिल्या वर्षी सुमारे सहा लाख रुपयांचा नफा झाला. त्यानंतर 2022मध्ये तब्बल 12 लाख रुपयांचा नफा झालाय. बियाणं खरेदी करण्यासाठी विविध राज्यातले शेतकरी माझ्याकडे येतात.'
कोटाच्या कृषी विज्ञान केंद्रात मिळतं प्रशिक्षण यशराज साहू म्हणाला, ‘मशरूमची लागवड 20 बाय 20 आकाराच्या खोलीतही करता येते. मशरूमच्या शेतीतून चांगला नफा मिळू शकतो. कोटा इथल्या कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना मशरूम लागवड आणि बीजनिर्मितीचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं.’ भारत हा कृषिप्रधान देश आहे. गेल्या काही वर्षांत उच्चशिक्षित तरुण कृषी व्यवसायाकडे वळू लागले आहेत. नोकरीमध्ये श्वाश्वती नसल्यामुळे अनेक जण शेती व पूरक व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या क्षेत्रात संशोधनही वेगानं होत असल्यामुळे त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होऊ लागला असून त्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होतेय.