अहमदनगर, 2 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याच कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) सुद्धा उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर शरद पवारांनी थेट आमदार निलेश लंके यांचं घर गाठलं. पुण्याला जात असताना सुपा येथे राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या घरी भेट दिली.
नगरसेवक, आमदार, खासदार म्हटलं की त्यांची घरेही आलिशान असतात. मात्र अत्यंत साधे राहणीमान असलेले आमदार निलेश लंके यांचं घरंही तसेच साधे आहे. छोट्याशा खोलीत राहणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या घरी शरद पवारांनी भेट दिली. यावेळी शरद पवारांनी एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून आमदार लंके यांच्या आई-वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली.
शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या घरी जाऊन भेट घेत कुटुंबाची चौकशी केली pic.twitter.com/s5n6w8hq4X
— News18Lokmat (@News18lokmat) October 2, 2021
आमदार निलेश लंके यांचं एक छोटंस घर आहे. घरात छोटं किचन, बाथरूम, एक खोली इतकं साधं घर आहे. या घरात निलेश लंके हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. यामध्ये आमदार निलेश लंके, त्यांचा भाऊ, पत्नी, मुलं, आई-वडील असं कुटुंब राहतं. शरद पवार घरी येताच त्यांची काहीशी धावपळ उडाली. यावेळी आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
यानंतर शरद पवार एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसले. त्यांच्या आजुबाजुला निलेश लंके यांचे आई-वडिल बसले होते. यावेळी शरद पवारांनी आमदार निलेश लंके यांच्या आई-वडिलांची आणि इतर सदस्यांची चौकशी सुद्धा केली. शरद पवार आपल्या घरी आल्याने लंके कुटुंबीय भारावून गेल्याचं पहायला मिळालं.
आमदार निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. जिल्हा परिषद सदस्या आणि निलेश लंके हे आमदार असतानाही त्यांचं घरं सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच आहे. एका छोट्याशा घरात जॉईंट फॅमिली राहते. तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्या असलेल्या त्यांच्या पत्नीही घरातील सर्व कामे करुन मग आपली जिल्हा परिषदेच्या संबंधित कामे करतात.
आमदार निलेश लंके यांनी कोरोनाच्या संकट काळात 1000 बेड्सचं कोविड सेंटर उभारलं होतं. या कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके हे स्वत: राहत होते. या कोविड सेंटरमध्ये सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. इतकेच नाही तर कोविड बाधित रुग्णांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम सुद्धा ते आयोजित करत होते.
यावेळी शरद पवार यांच्यासोबत आमदार रोहित पवार, अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे उपस्थित होते. शरद पवार गावात आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं यावेळी पहायला मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Nilesh lanke, शरद पवार