मुंबई 2 मे : राज्यात मागील तीन दिवसांमध्ये अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली हंगामी पीकांना याचा मोठा फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायत दारांना याचा मोठा फटका बसला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातही तापमानात वाढ होऊन चाळिशीच्या नजीक येऊन ठेपला आहे. त्यामुळे तीव्र उकाडा जाणवू लागला आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे खोळंबली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
काढणीला आलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात पडझड पहायला मिळाली. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात वादळी वारा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग याभागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. गोव्यातही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मागच्या दोन दिवसांपुर्वी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे तसेच अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बापरे! मुंबई-दुर्गापूर विमान वादळात अडकलं, तब्बल 40 प्रवासी जखमी, घटनेचा थरारक VIDEOजिल्ह्यातील काही भागात गारांचा सुद्धा पाऊस झाला. सकाळपासूनच उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्धा ते पाऊण तास कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह धुवांधार पाऊस आणि वारा सुरु होता.
कोकणात फळबागांचे मोठे नुकसान
दरम्यान सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा, फणस, काजू, कोकम, करवंद, जांभूळ यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात द्राक्षे, कांदा पिकाला अधिक दणका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतमालाला मिळणाऱ्या अनिश्चित दरामुळे शेतकरी आदीच चिंतेत आहे. अवकाळी पावसाच्या या पिकांवर परिणाम झाल्याने फळांचे दर सुद्धा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
शेतकरी हवालदिल
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे नैसर्गिक ऋतुचक्रही बदलत चालले आहे. ऐन उन्हाळ्यात, हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने या ऋतुचक्र बदलामुळे याचा थेट परिणाम पिकांवर व फळबागांवर होत आहे. फळबागांवर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढत असून पिकांचे उत्पादन कमी होत आहे. या ऋतुचक्र बदलाने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत असून एकूण खर्चात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.