नवी दिल्ली, 2 मे : विमानतळावर विमान उतरत असताना निर्माण झालेल्या टर्ब्युलन्समुळे स्पाईसजेटच्या (Spicejet) मुंबई-दुर्गापूर या विमानातील (Flight) सुमारे 40 प्रवासी जखमी झाले. रविवारी (1 मे 22) बंगालमधल्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातल्या अंदाल येथील काझी नझरूल इस्लाम विमानतळवर स्पाईसजेटचं बोईंग B737 (उड्डाण क्रमांक -SG 945) विमान उतरत असताना अचानक आकाशात मोठे वादळी वारे निर्माण झाले. या टर्ब्युलन्समध्ये (Turbulence) विमान अडकलं आणि यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. स्थानिक भाषेत या वादळी वाऱ्यांच्या स्थितीला कालबैसाखी म्हणून ओळखलं जातं. या घटनेत 40 प्रवासी जखमी झाले आहेत. काही गंभीर दुखापत झालेल्या प्रवाशांवर स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं, अशी माहिती अंदाल विमानतळाच्या सूत्रांनी दिली. टर्ब्युलन्सचा विमानाला झटका बसला आणि केबिनमधलं सर्व सामान प्रवाशांच्या अंगावर पडलं. या सर्व प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. लँडिंगवेळी डोक्याला दुखापत झालेल्या एका प्रवाशानं सांगितलं की, “मी सीटबेल्ट लावला होता. पण टर्ब्युलन्समुळे माझ्या सीटला जोरात धक्का बसला आणि सीटबेल्ट तुटला.” तर “विमान दुर्गापूर विमानतळावर उतरणार होते. परंतु, त्यावेळी हवामान अत्यंत खराब होते. टर्ब्युलन्समुळे विमान हवेतच गदागदा हलायला लागलं. त्यामुळे सर्व प्रवासी घाबरले. या मोठ्या घटनेत काही प्रवासी गंभीर जखमी झाले”, असं अकबर अन्सारी या जखमी प्रवाशानं सांगितलं.
A #SpiceJet Flight From Mumbai To Durgapur Encountered Severe Turbulence. The Incident Left 12 Passengers Injured. SpiceJet Expressed Regret Over The Unfortunate Incident.
— News18 (@CNNnews18) May 2, 2022
READ More: https://t.co/2YoK7IBmPO pic.twitter.com/YCVepmZdJH
एअर ट्रॅफिक कंट्रोलर (Air Traffic Controller) किंवा विमान चालवत असलेल्या पायलटला (Pilot) वादळाबाबतची माहिती देण्यात आली होती की नव्हती याबाबतचा खुलासा अद्याप झालेला नसला तरी यामुळे बेसावध असलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका नक्कीच निर्माण झाला होता. विमानाच्या पायलटने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत कसंतरी विमान विमानतळावर उतरवलं. मात्र तरीदेखील अनेक प्रवासी या दुर्घटनेत जखमी झाले. ( ‘…तर राज्यात पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल’, राजेश टोपेंचा स्पष्ट इशारा ) “या घटनेची चौकशी करण्यासाठी अनेक विषयांतील तज्ज्ञांच्या पथकाची स्थापना केली आहे. या दुर्घटनेत 15 प्रवासी जखमी झाले आहेत”, अशी माहिती विमान वाहतूक नियामक डिजीसीएनं (Aviation regulator -DGCA) सोमवारी (2 मे) दिली. स्पाईस जेटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “1 मे रोजी स्पाईसजेटचे बोईंग B737 (उड्डाण क्रमांक -SG 945) हे विमान मुंबईहून दुर्गापूर येथे जात होतं. हे विमान दुर्गापूर येथे उतरत असताना मोठ्या वादळात अडकलं. दुर्देवाने या घटनेत काही प्रवासी जखमी झाले. या विमानातील 11 प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी आतापर्यंत 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई-दुर्गापूर विमानातील क्रु मेंबर्सनी काही सूचना केल्या आणि प्रवाशांना आपल्याच सीटवरच बसून राहण्यास सांगितलं”, असं या प्रवक्त्यानं सांगितलं. “विमान दुर्गापूरला पोहोचताच प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. स्पाईसजेट म्हणून या दुर्दैवी घटनेबद्दल आम्ही खेद व्यक्त करत आहोत. प्रवाशांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत (Medical Assistance) पुरवली आहे”, असं या प्रवक्यानं स्पष्ट केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने सायंकाळी 5 वाजता मुंबईहून उड्डाण केलं आणि ते संध्याकाळी 7.30 च्या सुमारास अंदाल येथील काझी नजरुल इस्लाम विमानतळावर उतरणार होतं.