मुंबई, 15 जून : यंदाचा साखर हंगाम (sugarcane season) संपल्याचे साखर आयुक्तालयाकडून (sugar commissioner) सांगण्यात आले आहे. यंदा उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे साखरेचे उत्पादनही (sugarcane production) मोठ्या प्रमाणात झाले. राज्यातील 200 पैकी 198 साखर कारखान्यांची (sugar factories) धुराडी बंद झाली आहे. तर 1 हजार 320 लाख टन उसाचे यशस्वी गाळप करण्यात आले आहे. आतापर्यंत 137.27 लाख टन साखर तयार झाली असल्याची माहिती साखर संकुलातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान साखर आयुक्त म्हणाले की, राज्यातील साखर कारखाने, साखर आयुक्तालय, राज्य शासनाची यंत्रणा आणि शेतकरी यांच्या उत्तम समन्वयातून यंदाचा ऊसगाळप हंगाम यशस्वीपणे पार पडला आहे. शेतकऱ्यांना सर्वाधिक एफआरपी पेमेंट करून देणारा हंगाम म्हणून यंदाच्या गाळपाची नोंद राज्याच्या साखर उद्योगाच्या इतिहासात होईल असे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.
हे ही वाचा : भाजपच्या माजी सहकारमंत्र्यांच्या खत कंपनीसह राज्यातील 6 कंपन्यांवर मोदी सरकारकडून फौजदारीचे आदेश
कोल्हापूर विभागातील सर्व म्हणजे 36, पुणे विभागातील 30 पैकी 29, सोलापूर विभागातील 47, नगर विभागातील 28 तर औरंगाबाद विभागातील 25 पैकी 24 साखर कारखाने बंद झालेले आहेत. नांदेडमधील सर्व म्हणजे 27, अमरावतीमधील 3 तर नागपूरमधील चारही कारखाने बंद झालेले आहेत.
राज्यात आता राजगड सहकारी साखर कारखाना (अनंतनगर, ता. भोर) व संत मुक्ताईनगर शुगर अॅन्ड एनर्जी (घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) यासह औरंगाबाद विभागातील एक कारखाना अजून काही दिवस चालू राहण्याची शक्यता आहे. “नियोजनाप्रमाणे राज्यातील सर्व उसाचे गाळप झालेले आहे. मराठवाड्यासह आता कोणत्याही भागात गाळपाविना ऊस शिल्लक नाही. काही भागातील उर्वरित ऊस गाळण्यासाठी दोन कारखाने पुढील 2-3 दिवस चालू राहतील, अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.
राज्यात यंदा 101 सहकारी आणि 99 खासगी अशा एकूण 200 कारखान्यांनी गाळपात भाग घेतला. यातील 198 साखर कारखाने 13 जूनअखेर बंद झाले आहेत. गेल्या हंगामात 190 कारखाने बंद झाले होते.
हे ही वाचा : साखर उत्पादनात महाराष्ट्राची बाजी, देशात पहिल्या तर जगात दुसऱ्या क्रमांकावर
महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील 5 कोटी शेतकरी आणि राज्यातील 40 लाख शेतकरी ऊस पीक घेतात. या हंगामात महाराष्ट्रात १३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला होता. यातून १३ कोटी २० लाख टन उसाचे उत्पादन झाले आहे. राज्यात साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणाग गाळप झाले. कोल्हापुरातील कारखान्यांमधील 2 कोटी 54 लाख 69 हजार उसापासून 3 कोटी 41 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. राज्यात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोल्हापूर विभागात झाले.
सातारा जिल्ह्यात अद्यापही ऊस शिल्लक
सातारा जिल्ह्यात अद्याप 20 हजार टन ऊस शिल्लक असताना सर्व कारखान्यांनी मात्र गाळप हंगामाची सांगता केली आहे. वाईसह जावळी, खंडाळा तालुक्यांतील 20 हजारांवर टन ऊस गाळपाविना उभा आहे. एकूण परिस्थिती बघता हा ऊस तुटणार नसल्याने शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला जात नसल्याने पेटवून देत त्याचे जळण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही शेतकरी निराश झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात 14 साखर कारखाने आहेत यामध्ये काही कारखान्यांनी मे महिन्यापर्यंत गाळप केले. अजिंक्यतारा कारखाना वगळता इतर सर्व कारखान्यांनी मे महिन्यांच्या सुरुवातीला कारखाने बंद केले. अजिंक्यतारा कारखान्याने ३ जूनअखेर गाळप केले. दरम्यान शिल्लक राहिलेल्या उसाचा प्रश्न गंभीर झाल्याने कोणाला जाब विचारायचा हा प्रश्न समोर राहिला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांनी जबाबदारी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.