मुंबई, 16 जून : राज्यात रोव्हर मशिनद्वारे (Rover machine) जमीनीच्या मोजणीच्या (Land Survey) कामांना गती मिळत आहे. दरम्यान हे मशिन कमी असल्याने काही भागातच मोजण्या लवकर होत आहेत. यामुळे राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. (Maharashtra government)
जमिनी मोजण्याच्या प्रकरणांना गती देण्यासाठी ‘रोव्हर मशिन’ खरेदी करण्यात येणार आहेत. राज्य सरकार व जमाबंदी आयुक्त कार्यालयाने यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यातून अडीचशे मशिन खरेदी केल्या जाणार आहेत. यामुळे राज्यात दर महिन्याला सुमारे १० हजार जमीन मोजणी प्रकरणे निकाली निघणे शक्य होणार असल्याचे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा : ‘विधान परिषदेत खडसेंना पाडण्याचा प्लॅन’, खासदार इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप
जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या मदतीने राज्यात 77 ठिकाणी ‘कॉर्स’ (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहेत. त्या आधारे केवळ 30 सेकंदांत जीपीएस रीडिंग घेता येते. ते ‘रोव्हर रिसिव्ह’ द्वारे रीडिंग टॅबमध्ये दिसते. राज्यात भूमी अभिलेख विभागाची 355 कार्यालये आहेत. त्यामध्ये ‘रोव्हर मशिन’ उपलब्ध करून देण्यास भूमी अभिलेख विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्या तालुक्यांमध्ये मोजणीची अधिक प्रकरणे प्रलंबित आहे. त्यांना प्राधान्याने ही मशिन दिले जाणार असल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
जमीन मोजणी सध्या ईटीएस मशिनच्या साह्याने केली जाते. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. त्या आधारे जमीन मोजणी करणे जीपीएस रीडिंग घेण्यासाठी सोयीचे ठरते. पंरतु यासाठी किमान 3 ते 4 तासांचा कालावधी जातो.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांचं मोदींसाठी ‘Mission 26’, भाजपच्या गोटात मोठं काहीतरी घडतंय
या रोव्हर मशिनमुळे कामाला वेग येणार यामुळे अधिकाऱ्यांचा या कामासाठी लागणारा वेळ पूर्णपणे वाचणार आहे. याचबरोबर कामात अचूकता येणार असल्याने जमिनदारांचे समाधान होणार आहे. दरम्यान एका रोव्हर मशिनमुळे दररोज चार ते पाच ठिकाणी मोजणी शक्य होणार आहे. यामुळे काही तासात जमीन मोजणी निकालात निघणार आहे. जमीन मोजणीची गती वाढल्याने वेळेतही बचत होण्यास मदत होणार आहे. जीपीएस रीडिंगसाठी ‘कॉर्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याने अचुकता वाढणार आहे. त्याआधारे जीपीएस रीडिंग केवळ 30 सेकंदांत घेणे शक्य होणार आहे. परिणामी मोजणीच्या कामात अचुकता येऊन कालावधीही कमी होणार आहे.