मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

देवेंद्र फडणवीसांचं मोदींसाठी 'Mission 26', भाजपच्या गोटात मोठं काहीतरी घडतंय

देवेंद्र फडणवीसांचं मोदींसाठी 'Mission 26', भाजपच्या गोटात मोठं काहीतरी घडतंय

राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड घडामोडी सुरु असताना भाजप मात्र नव्या मिशनला लागलं आहे. हे मिशन म्हणजे 'मिशन 26'!

राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड घडामोडी सुरु असताना भाजप मात्र नव्या मिशनला लागलं आहे. हे मिशन म्हणजे 'मिशन 26'!

राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड घडामोडी सुरु असताना भाजप मात्र नव्या मिशनला लागलं आहे. हे मिशन म्हणजे 'मिशन 26'!

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 16 जून : दूरदृष्टी असणं नेहमीच चांगलं असतं. आपण दूरचा विचार करणं म्हणजे आपल्या भविष्याचा विचार करणं. याचा अर्थ सध्याच्या घडीला आपलं सारं काही सुरळीत सुरु आहे. आणि आता आपण भविष्याचं प्लॅनिंग करतोय. तसंच काहीसं भाजपच्या गोटात सध्याच्या घडीला घडताना दिसत आहे. भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीच्या (MLC Election 2022) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटात प्रचंड घडामोडी सुरु असताना भाजप (BJP) मात्र नव्या मिशनला लागलं आहे. हे मिशन म्हणजे 'मिशन 26'! (Mission 26) महाराष्ट्रात लोकसभेच्या सध्या 48 जागा आहेत. म्हणजे महाराष्ट्रात एकूण 48 खासदार आहेत. यापैकी भाजपचे सर्वाधिक 22 खासदार आहेत. राज्यात गेल्यावेळी लोकसभेची 2019 ची निवडणूक झाली त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीचं राज्य होतं. युतीच्या पार्श्वभूमीवरच दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी झाल्या होत्या आणि जागा देण्यात आल्या होत्या. अर्थात त्यावेळी दोघांच्या बाजूने बंडखोरांना उभं करण्यात आलं होतं हे सत्य नाकारता येणार नाही. पण त्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये अधिकृत युती होती. महाराष्ट्रात विधानसभेची 2019 ची निवडणूक पार पडल्यानंतर ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर शिवसेना आणि भाजपची गेल्या तीन दशकांपासूनची पांरपरिक युती तुटली होती. आता 2019 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक उलटून जायला बराच वेळ झाला आहे. आता तर नव्या लोकसभा निवडणुकीच्या पहाट उजाडणार आहे. त्याची चाहूल भाजपला आतापासूनच लागली आहे. त्यामुळे भाजपकडून 'मिशन 26' सुरु करण्यात आलं होतं. भाजपचं 'मिशन 26' म्हणजे नेमकं काय? लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपचे 22 खासदार निवडून आले होते. अर्थात त्यावेळी युती होती. त्यामुळे शिवसेनेसोबत झालेल्या वाटाघाटीमुळे काही ठिकाणी भाजपला त्यांचे अधिकृत उमेदवार उभे करता आले नव्हते. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे भाजप आगामी लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत सर्वच जागांवर उमेदवार उभे करणार आहे. भाजप आज ज्या जागांवर सत्तेत आहे त्या जागांवर पुन्हा निवडून येण्याची भाजपला खात्री आहे. म्हणजे भाजपचे जे 22 खासदार आहेत ते पुन्हा जिंकून येतील. पण ज्या 26 जागांवर भाजपचे खासदार नाहीत किंवा पराभव झालेला आहे त्याठिकाणी भाजप आता सर्वात जास्त काम करणार आहे. त्याचसाठी भाजपने 'मिशन 26' सुरु केलं आहे. या मिशनमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन मात्र नक्की वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मिशनसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री राज्यातील वेगनेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रभारी म्हणून कार्यान्वित होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मित्रपक्षाच्या वाटाघाटी लक्षात घेऊन सर्व घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (भाजपचं आतापासूनच 'मिशन लोकसभा' सुरू, फडणवीसांनी आखला मोठा प्लॅन!) देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? भाजपची आज विरोक्षीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणूक संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात ज्या जिल्ह्यात भाजप पराभूत झाली आहे, त्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून नेमले जाणार आहेत. भाजप जिल्हाध्यक्षांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. केंद्रातील सर्व योजना आपल्या जिल्ह्यात घरोघरी राबवणे. लोकसभा निवडणूक संदर्भात जे काही कार्यक्रम असतील ते तंतोतंत राबवणे, असे आदेश नेते आणि कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. "भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या आहेत. आम्ही राज्यात एक समिती नेमली आहे त्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली. पुढच्या 18 महिन्यात काय करायचे हे नियोजन आखलं आहे. फक्त निवडणुकीपुरते नाही तर सातत्याने आमचे लोक, जी आम्ही जिकलो त्यावर तर आमचे लक्ष आहे पण जे नव्याने जिंकायचे त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहेत. 48 मतदारसंघात आम्ही ताकदीने जिकू", असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपची महाराष्ट्राकडे आशा लोकसभेच्या आगामी निवडणुकीला अजून थोडा अवकाश असला तरी भाजप कामाला लागली आहे. भाजपची उत्तर प्रदेशात चांगली ताकद आहेत. तिथे लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. यापैकी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 62 जागांवर विजय मिळवला होता. उत्तर प्रदेशनंतर पश्चिम बंगालमध्येही लोकसभेच्या 42 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये प्रचंड ताकद लावली होती. त्यावेळी तिथे 42 पैकी 18 जागांवर भाजपला यश मिळालं होतं. पश्चिम बंगालमधील त्यावेळची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत बराच फरक आहे. कारण पक्षात आलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी पुन्हा त्यांच्या मूळ पक्षात घरवापसी केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला कडवे आव्हान आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपला सध्याच्या परिस्थितीत अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे भाजपच्या महाराष्ट्राकडे सर्वाधिक जागा जिंकून येण्याची आशा आहे. यासाठीच भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचं मानलं जात आहे.
First published:

पुढील बातम्या