साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 16 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्हा हा मुख्यतः ऊसशेतीवर अवलंबून आहे. मुख्यतः पारंपारिक वाणाचे ऊस पीक सर्व शेतकरी घेतात. पण कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात काळ्या ऊसाचे वाण घेतले आहे. खरंतर औषधी गुणधर्माच्या या वाणाचे जतन करण्याच्या हेतूने हे ऊस पीक घेण्यात आले आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथे सुखदेव गिरी यांचे देवगिरी फार्म नावाचे कृषी पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणी तब्बल 10 गुंठे जागेत हा काळा ऊस घेण्यात आला आहे. या शेतात रोहन बुवा हे सगळी शेती सांभाळतात. गेली 4 वर्षे या ठिकाणी अशा प्रकारच्या काळ्या ऊसाचे पीक घेतले जात आहे. साधारण 4 वर्षांपूर्वी बारामती येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनातून या काळ्या ऊसाच्या वाणाचे 100 डोळ्यांचे बियाणे त्यांनी आणले होते. हळूहळू त्याचे जतन करण्याच्या दृष्टीने हे पीक लावले जात होते. यंदा मात्र तब्बल 10 गुंठे जागेत या काळ्या ऊसाच्या वाणाचे पीक त्यांनी घेतले आहे, असे रोहन बुवा यांनी सांगितले.
भारतात काळ्या ऊसाची लागवड प्रामुख्याने मध्यप्रदेश, गुजरात आणि दक्षिण भारतातील काही भागात केली जाते. काळा ऊस लोकांना फारसा माहीत नाही, परंतु त्याचा औषधी गुणधर्म पाहता, त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे त्याची मागणी आता वाढू लागली आहे. काय आहेत या ऊसाचे फायदे ? या काळ्या ऊसाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही फायदे या देवगिरी फार्मचे मालक सुखदेव गिरी यांनी सांगितले आहे. ते खालील प्रमाणे. 1) काळा ऊस चेहऱ्यावर आणि शरीरावर असणारे मुरुम, पुरळ दूर करतो आणि त्यांना वाढण्यास प्रतिबंध करतो. 2) रोज 1 ग्लास या काळ्या ऊसाचा रस पिल्यामुळे वयोमानानुसार येणाऱ्या सुरकुत्या लवकर येत नाहीत. 3) उन्हाळ्यात झटपट ऊर्जेसाठी काळा ऊस उत्तम असतो. 4) अनेकदा अपचन वेगैरे कारणांमुळे श्र्वासाला दुर्गंधी येऊ शकते. अशा वेळी काळ्या ऊसाचे सेवन उपयुक्त ठरू शकते. 5) काळा ऊस खाल्ल्याने वजन कमी करण्यास देखील मदत होते.
मंदिरात नारळ फोडल्यानंतर वाया जाणार नाही पाणी! पाहा लय भारी आयडिया, Video
या काळ्या ऊसाच्या अनेक औषधी गुणधर्मामुळे या ऊसाची मागणी आता वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकरीही त्याच्या लागवडीवर अधिक भर देताना दिसत आहेत. म्हणूनच या काळ्या ऊसाचे वाण जतन करण्यासाठी आम्ही ही त्याची शेती केली तर इतर शेतकऱ्यांना देखील या ऊसाची लागवड करण्यास आम्ही प्रोत्साहित करत असल्याचे देखील रोहन यांनी सांगितले. पत्ता : देवगिरी फार्म, बांदिवडे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर संपर्क : +9195521 53133