औरंगाबाद, 2 डिसेंबर : सतत येणाऱ्या संकटामुळे शेती हा तोट्याचा व्यवसाय समजला जातो. अनेक शेतकऱ्यांची मुलं यामुळे नोकरी किंवा अन्य व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. या बिकट परिस्थितीतही काही जण शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करुन यशस्वी होत आहेत. शेतीचं शास्त्रीय शिक्षण घेऊन, हवामान, पिकांची पद्धत आणि अन्य सर्व कृषी विषयक गोष्टींचा अभ्यास करुन ते यशस्वी होतायत. पण, लग्नापूर्वी शेतीचा कोणताही संबंध नसलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या महिलेनं आधी शेतीमध्ये काम केलं. या कामातील चुकांमधून ती शिकली आणि आता अन्य महिलांना फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून धडे देत आहे.
बालपण शहरातच गेल्यामुळे शेतीशी कधीच संबंध न आलेल्या सविता यांचा विवाह शेतकरी असलेल्या तरुणांशी झाला आणि चार भिंतीत काम करणाऱ्या सविता यांच्या वरती एकरभर शेतीचं काम करण्याची जबाबदारी आली मात्र शेतीत कधीच काम न केल्यामुळे त्यांना दडपण आलं मात्र या परिस्थितीवर मात करत त्यांनी स्वतः शेतीचे काम तर शिकलच मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या इतर शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा व महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कसा झाला प्रवास?
सविता सुनील डकले असं या महिला शेतकऱ्याचं नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातलं धानोरा हे त्यांचं मुळ गाव. सविता औरंगाबाद शहरात दहावीपर्यंत शिकल्या. शहरातचं बालपण गेल्यानं त्यांचा शेतीशी कधीही संबंध आला नव्हता. इतकंच काय आपल्याला शेतकऱ्याशी लग्न करावं लागेल, असा विचारही त्यांनी कधी केला नव्हता. पण, नियतीच्या मनात वेगळंच होतं.
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, किटकनाशकांपासून संरक्षण करणारी नवीन सिस्टीम तयार, Video
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पेडगाव येथील शेतकरी सुनील डकले यांच्याशी त्यांचं लग्न झालं. सुनील शेतकरी आहेत. शहरात वाढलेल्या सवितांसोर शेतीमध्ये काम कसं करायचं हा मोठा प्रश्न होता. त्यांना सुरूवातीला या कामात अनेक अडचणी आल्या. . पहिल्या दिवशी कापूस वेचणी सुरू असताना सविता यांनी कापूस वेचला सोबतच्या महिलांनी 50 किलो पेक्षा अधिक कापूस वेचला त्यावेळेस सविता यांनी फक्त आठ किलो कापूस वेचला होता. त्यावरून सोबतच्या महिलांची त्यांची चेष्टाही केली.
नवखेपण, अडचणी, मस्करी अशा अनेक अडचणी असल्या तरी शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी शिकण्याचा सवितांचा निश्चय होता. त्यांनी हे आव्हान स्विकारलं. जबाबदारी घेऊन काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना हळूहळू हे काम जमायला लागलं.
नोकरी सोडून सुरु केली खेकड्यांची शेती, आता करतोय लाखोंची कमाई! Video
शेतकरी टिचर
शेतीमध्ये काम सुरू केल्यानंतर त्याच्यामधीस अडचणी सवितांना समजल्या. गेल्या कित्येक वर्षांपासून पारंपारिक पद्धतीनं शेती केल्यानं हे नुकसान होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी माहिती घेत स्वत: शेतीमध्ये सुधारणा केल्या. आपल्याला होत असलेला फायदा इतरांना द्यावा यासाठी त्यांनी इतर शेतकऱ्यांनाआधुनिक शेतीचे धडे देण्यास सुरूवात केली.
फेसबुकचा वापर
सविता यांचा फेसबुकवर 'वूमन इन ॲग्रीकल्चर', (Women in Agriculture) हा ग्रुप असून त्या ग्रुपचे 7 लाख 42 हजार सदस्य आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून शेतीची मशागत विज्ञानाची खरेदी व निर्मिती सोबतच गांडूळ खता संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर शेतीतून मिळालेले उत्पन्न आणि विक्री कशी आणि कुठे करायची या संदर्भातही त्यांना मार्गदर्शन केलं जातं. या ग्रुपवर शेतकरी त्यांचे प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांना सविता आणि ग्रुपमधील अन्य तज्ज्ञ शेतकरी उत्तर देतात.
सविता यांना ग्रामीण भागातील महिलांच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. या महिला सक्षम झाल्या पाहिजेत. त्यांच्या निर्णयाला देखील घरामध्ये तेवढेच महत्त्व दिलं जावं यासाठी त्या प्रयत्न करू लागल्या. यासाठी त्यांनी जवळपास 800 ग्रुपमध्ये 70 हजाराहून अधिक महिला जोडले आहेत. या महिलांना आता बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मिळते. या पैशांचा वापर महिला घरखर्च तसंच रोजगार निर्मितीसाठी करतात, असं सविता यांनी सांगितलं.
सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार!
शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करण्याची पद्धत बदलली पाहिजे. आधुनिक पद्धतीने शेती करून शाश्वत शेती केल्यास त्यांना फायदा होईल. त्याचबरोबर शेतकरी महिलांनीही आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. मी आत्तापर्यंत सात लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. मला भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं असून ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असतील, असं सविता यांनी सांगितलं.
टोमॅटोप्रमाणे चक्क झाडाच्या फांदीला लगडले बटाटे, पाहण्यासाठी मोठी गर्दी
सविताला यापूर्वी शेतीमधलं काहीही येत नव्हतं. आती ती शेती करतेच त्याचबरोबर इतरांनाही धडे देते. सविताच्या कामामुळे डकले परिवाराची मान उंचावली आहे. सविताच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांचे पती सुनील यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Aurangabad, Farmer, Local18, Success story