मुंबई 31 मे : गायी आणि घोड्यांना शांत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ट्रँक’ म्हणजेच झायलाझीन औषधामुळे यूके मध्ये एका 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. दुसरीकडे, अमेरिकेमध्ये अनेक शहरांमध्ये तरुण वर्ग या औषधाचं ड्रग्ज म्हणून सेवन करत असल्यानं चिंता वाढत आहे. हे औषध आता ‘झोम्बी ड्रग’ म्हणून ओळखलं जात आहे. अमेरिकेमध्ये या ड्रग्जच्या काळा बाजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच काही विक्रेते हेरॉईन तसंच फेंटॅनाइलसारख्या इतर अवैध औषधांमध्ये हे ड्रग्ज मिसळतात. ‘डीएनए’ने याबाबत वृत्त दिलंय. वेस्ट मिडलँड्समधील सोलिहुल येथील कार्ल वॉरबर्टन यांच्या मुलाचे मे 2022 मध्ये त्याच्या राहत्या घरी निधन झालं होतं. अंमली पदार्थांच्या गैरवापर केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात नोंद करण्यात आली होती. याबाबत बीबीसीनं वृत्त दिलं होतं. त्यातच आता द जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लीगल मेडिसीननं त्याच्या मृत्यूबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात नेमकं काय? या अहवालात म्हटलं आहे की, ‘संबंधित व्यक्तीनं जे हेरॉइन खरेदी केलं होतं, त्यामध्ये झायलाझीन आणि फेंटॅनाइल मिसळलं होतं,’ अहवालात पुढं स्पष्ट करण्यात आलं आहे की, ‘आमच्या माहितीनुसार यूकेमध्ये आणि अगदी युरोपमध्ये आढळलेल्या झायलाझीनच्या वापराशी संबंधित हा पहिला मृत्यू आहे. यामुळे यूकेमध्ये झायलाझीन सहजासहजी उपलब्ध होतंय, हे स्पष्ट होतंय. त्या मुलाच्या रक्तात आठ तर लघवीमध्ये अकरा ड्रग्ज असल्याचं त्याच्या टॉक्सिकॉलॉजी रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.’ हेरॉईन, फेंटॅनाइल, कोकेन आणि झायलाझीन या सर्वांमुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला, याकडेही अहवालात लक्ष वेधलं आहे. त्यामुळेच त्या मुलाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. काय आहे झोंम्बी ड्रग्ज? गेल्या वर्षी अमेरिकन लोकांमधील विचित्र वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अमेरिकेमध्ये नागरिकांची त्वचा कुजू लागली असून ते चक्क झोंम्बीसारखे दिसत होते. हा “झोम्बी व्हायरस” असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात हा परिणाम झायलाझीन ड्रग्ज घेतल्यानं झाल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता असं आढळून आलं आहे की, जे लोक झायलाझीन घेतात त्यांना गंभीर दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे. काय परिणाम होतो… झायलाझीन ड्रग्जचं सेवन केल्यानंतर बेशुद्ध होणं, सारखी झोप लागणं आणि श्वास घेताना अडचणी येणं, अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे व्यक्तीला उभं राहणंसुद्धा अशक्य होतं. या ड्रग्जचं सेवन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या त्वचेवर जखमा होण्याचा धोका असतो. त्याची त्वचा मृत होते. या ड्रग्जचा जास्त डोस झाल्यास व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. खरं तर, या ड्रग्जच्या सेवनाचे मोठे दुष्परिणाम आहेत. त्यातच आता यूकेमध्ये एकाचा या ड्रग्जमुळे मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं ही धोक्याची घंटा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.