नवी दिल्ली, 17 जून: पृथ्वीचा 70 टक्क्यांहून जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. भूगोल (Geography) या अभ्यासविषयाच्या अनुषंगाने या पाण्याचं चार महासागरात विभाजन करण्यात आलं आहे, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. नॅशनल जिऑग्राफिकने (National Geographic) आता एका पाचव्या महासागराची घोषणा केली आहे. वर्ल्ड ओशन डे (World Ocean day) अर्थात जागतिक महासागर दिनी नॅशनल जिऑग्राफिकने दक्षिणी महासागर (Southern Ocean) या पाचव्या महासागराची घोषणा केली आहे. हा वास्तविक अंटार्क्टिकाच्या (Antarctica) जवळपासचा महासागराचा भाग आहे. महासागराच्या या भागाला वेगळं नाव द्यावं की नाही, याबद्दल बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. म्हणूनच अद्याप आंतरराष्ट्रीय पातळीवर हा वेगळा महासागर म्हणून घोषित झालेला नाही. नॅशनल जिऑग्राफिक अर्थात नॅट-जिओचं म्हणणं आहे, की 1915पासून जेव्हा नकाशे बनवण्याचं काम सुरू झालं, तेव्हापासून जगभरात केवळ चारच महासागरांना मान्यता देण्यात आली आहे. अटलांटिक, प्रशांत, हिंदी आणि आर्क्टिक महासागर हे ते चार महासागर होत. या विषयावर बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. आता आठ जूनच्या जागतिक महासागर दिनापासून दक्षिणी महासागर हा पाचवा महासागर म्हणून ओळखला जाईल. नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीचे जिऑग्राफर एल्क टेट म्हणतात, की दक्षिणी महासागराला शास्त्रज्ञ पूर्वीपासूनच मान्यता देत होते; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर याबद्दल कधीच सहमती झाली नाही. त्यामुळे अधिकृतरीत्या पाचव्या महासागराला मान्यता देण्यात आली नाही. महासागरांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण दक्षिणी महासागरात आहेत की नाहीत, याबद्दल काही भूगोलतज्ज्ञांमध्ये साशंकता होती. म्हणूनच त्याला पाचवा महासागर म्हणून घोषित करण्यात आलं नव्हतं. 1999 साली नॅशनल ओशियानिक अँड अॅटमोस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने (NOA) दक्षिणी महासागर हा पाचवा महासागर असल्याचं म्हटलं होतं. मात्र 2000 साली इंटरनॅशनल हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशन (IHO) त्याच्याशी सहमत झाली नाही. सर्व प्रकारे सर्वेक्षण करून नकाशे तयार करण्याचं काम IHOकडून केलं जातं. हेही वाचा- इव्हेंटच्या आधीच मायक्रोसॉफ्टची मोठी माहिती लीक आता नॅट-जिओने निश्चित केलं आहे, की अंटार्क्टिकाच्या जवळपासच्या 60 अंश दक्षिण अक्षांशापर्यंतचा प्रदेश दक्षिणी महासागर म्हणून ओळखला जाईल. त्यात डार्क पॅसेज आणि स्कोटिया सागर यांचा समावेश असणार नाही. अनेकांना असं वाटू शकतं, की नावावरून एवढी कसरत कशासाठी? NOAचे शास्त्रज्ञ आणि नॅशनल जिऑग्राफिकचे एक्स्प्लोरर सेठ सिकोरा बोडी सांगतात, की याची व्याख्या करणं अवघड आहे; मात्र इथल्या हिमनद्या जास्त निळ्या असतात, हवा जास्त थंड असते, हे सर्वांनाच ज्ञात आहे. नॅशनल जिऑग्राफिकचे एक्स्प्लोरर एन्रिक साला यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितलं, की दक्षिणी महासागराच्या पाण्यात शक्तिशाली सर्कमपोलर करंटचं वैशिष्ट्य आहे आणि ते पूर्वेच्या दिशेने वाहतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.