मुंबई, 11 एप्रिल : ऑक्टोपसबद्दल ऐकलं असेल; पण जगातल्या सर्वांत विषारी ऑक्टोपसबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. जगातल्या सर्वांत विषारी असलेल्या ऑक्टोपसच्या शरीरात इतकं विष असतं, की तो एका वेळी 25 पेक्षा जास्त व्यक्तींना मारू शकतो. त्याचं विष सायनाइडपेक्षा हजारपट जास्त धोकादायक असतं, असं शास्त्रज्ञ सांगतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की विषारी ऑक्टोपसने एका महिलेला एकदा नव्हे, तर दोन वेळा दंश केला; पण ही महिला त्यातून आश्चर्यकारकरीत्या वाचली असून, तिला काहीच झालं नाही. `लाइव्ह सायन्स`च्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातल्या सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यावर एक महिला पोहण्याचा आनंद घेत होती. त्या वेळी ब्लू रिंग्ड ऑक्टोपसने तिच्या पोटावर दोन वेळा दंश केला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी फेसबुकवर हा प्रसंग शेअर केला. त्यात ते लिहितात, की ती महिला पोहत असताना तिला लहान शेलच्या आकाराची वस्तू दिसली; मात्र ती वस्तू नसून विषारी ऑक्टोपस होता. तिने त्याला उचललं असता, तो तिच्या पोटावर पडला. त्या वेळी ऑक्टोपस त्या महिलेच्या पोटाला चावला. महिलेला पोटावर तीव्र वेदना जाणवू लागल्या. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि कोल्ड कॉम्प्रेसने उपचार करण्यात आले. तिला काहीही झाले नाही. तो ब्लू रिंग्ड ऑक्टोपस असल्याचं नंतर उघड झालं. जगभरात विषारी ऑक्टोपसच्या आहेत केवळ चार प्रजाती ऑक्टोपसच्या 300 हून अधिक प्रजाती आढळतात. ब्लू रिंग्ड ऑक्टोपस हा सर्वांत धोकादायक आणि विषारी असतो. त्याच्या चार जाती आहेत. ग्रेटर ब्लू रिंग्ड ऑक्टोपस, सदर्न ब्लू रिंग्ड ऑक्टोपस, ब्लू लाइंड ऑक्टोपस आणि कॉमन ब्लू रिंग्ड ऑक्टोपस यांचा त्यात समावेश आहे. हे ऑक्टोपस इतके लहान असतात, की तळहातावर ते सहजपणे बसू शकतात. त्यांचं शरीर एका लहान अंगठीसारख्या आवरणानं झाकलेलं असतं. ते धोक्याच्या वेळी इंद्रधनुष्यातल्या निळ्या रंगाप्रमाणे चमकतं. वाचा - कधी झोपेत मृत्यू तर कधी अंगाला सूज, पाकिस्तानात ‘या’ 5 सापांनी उडवली खळबळ शास्त्रज्ञांच्या मते, या ब्लू रिंग्ड ऑक्टोपसच्या विषामध्ये टेट्रोडोटॉक्सिन आढळतं. ते एक शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन आहे. मानवासाठी ते सायनाइडपेक्षा हजार पट जास्त विषारी आहे. याच्या अगदी लहान डोसमुळेदेखील अवयव काम करणं थांबवू शकतात. यामुळे नर्व्हज आणि स्नायू ब्लॉक होतात आणि काही सेकंदात एखाद्या व्यक्तीला अर्धांगवायू (स्नायूंचा पक्षाघात) होऊ शकतो. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन अर्थात `सीडीसी`ने दिलेल्या माहितीनुसार, त्याचं विष शरीरात गेल्यास 20 मिनिटांत व्यक्तीचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे ऑक्टोपस स्वतः हे विष बनवत नाहीत. त्याच्या लाळग्रंथींमध्ये एका विशेष प्रकारचे जिवाणू आढळतात. ते जिवाणू विष तयार करतात. ते ऑक्टोपस इतके धोकादायक असतात, की त्यांच्या त्वचेला स्पर्श केला तरी संबंधित व्यक्तीला विषबाधा होऊ शकते. चार वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला हा ब्लू रिंग्ड ऑक्टोपस टास्मानियासह संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. 2006मध्ये क्वीन्सलँडच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या एका रॉक पूलमध्ये चार वर्षांच्या एका मुलाला ऑक्टोपसने दंश केला; पण तो मुलगा थोडक्यात बचावला. क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अहवालानुसार, या मुलाला लगेच उलट्या झाल्याने त्याचा जीव वाचला; मात्र काही वेळातच विषामुळे त्याची दृष्टी गेली. स्नायूंवरचं नियंत्रण संपुष्टात आलं. म्हणजेच त्याला जवळपास अर्धांगवायू झाला होता. हा मुलगा सुमारे 17 तास व्हेंटिलेटरवर होता. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. या पार्श्वभूमीवर ती महिला कशी वाचली याचं शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटत असून, त्यांनी त्यावर संशोधन सुरू केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.