मंगळुरू : एखाद्या व्यक्तीच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे मोठा रेल्वे अपघात टळल्याचं आपण अनेकदा वाचतो, ऐकतो. अशाच प्रकारची एक घटना काही दिवसांपूर्वी घडली आणि ती नुकतीच उघडकीस आली आहे. एका वृद्ध महिलेच्या प्रसंगावधामुळे मत्स्यगंधा एक्सप्रेसचा अपघात टळला. विशेष म्हणजे या 70 वर्षांच्या महिलेची हृदयाची शस्त्रक्रिया झालेली असूनदेखील रेल्वे प्रवाश्यांचे प्राण वाचवण्यासाठी ती 150 मीटर धावली आणि तिने वेळेत सिग्नल दिल्याने मोठा अनर्थ टळला. बुधवारी रेल्वे विभागाने या महिलेचा विशेष सन्मान करून तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.
हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या एका धाडसी आणि सजग वृद्ध महिलेनं तिच्या घरापासून 150 मीटर अंतर पळत जाऊन लाल कपड्याच्या मदतीनं रेड सिग्नल दाखवल्यानं मोठा रेल्वे अपघात टळला आहे. शहरातील रेल्वे रुळांवर एक झाड पडलं होतं. यावर एक्सप्रेस आदळू नये म्हणून या महिलेनं जीवाचं रान केलं. ही घटना 21 मार्च रोजी घडली. पण नुकतीच ही घटना उघडकीस आली. या महिलेचं नाव चंद्रावती असून, रेल्वे विभागाने बुधवारी तिचा विशेष सन्मान केला आहे.
Video : मजुरांच्या जुगाडासमोर मोठ-मोठे इंजिनिअर्स ही फेल, एकदा हा जुगाड पाहाच
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी चंद्रावती घरी एकटी होती. तिचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता आणि नातू कॉलेजला गेला होता. याबाबत चंद्रावतीनं सांगितलं, “रेल्वे रुळांमुळे आम्हाला घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे माझे पती त्यांचे वाहन रुळांच्या पलीकडे कोणाच्या तरी घरी लावायचे आणि घरी चालत यायचे. मात्र एकेदिवशी ते रुळांवर पडले आणि काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही.”
सोर्स : गुगल
सोर्स : गुगल
“त्या दिवशी दुपारी जेवण करून मी झोपण्याच्या तयारीत होते. त्यावेळी मला डोंगर कोसळल्यासारखा मोठा आवाज ऐकू आला. मी माझ्या घरापासून 150 मीटर अंतरावर असलेल्या पडिल आणि जोकट्टे दरम्यान पाचनडीजवळील मंदारा येथील रेल्वे ट्रॅकच्या दिशेनं धाव घेतली. त्यावेळी मला रुळावर एक मोठं झाड आडवं पडल्याचं दिसलं. झाडामुळे रुळ पूर्णपणे झाकले गेले होते. माझे मुंबईतील नातेवाईक कायम रेल्वेनं प्रवास करत असल्याने मला साधारणपणे रेल्वेचं वेळापत्रक माहिती आहे. झाड रुळावर पडल्याचं पाहिलं तेव्हा दुपारचे 2 वाजून 10 मिनिटं झाली होती. आता मत्स्यगंधा एक्सप्रेस मंगळुरूहून मुंबईला 10 मिनिटांत निघेल, हे लक्षात येताच माझ्या अंगाचा थरकाप उडाला. पण निराशा न होता, न घाबरता मी देवाचं स्मरण करत घराच्या दिशेनं धावत गेले. नातवाची लाल बर्मुडा पँट घराबाहेर वाळत होती. ही पँट घेऊन मी ट्रॅकवर आले. ट्रेन घटनास्थळापासून काही अंतरावर असल्याचे दिसताच मी लाल पँट हवेत फडकावयला सुरूवात केली. माझा सिग्नल मिळताच रेल्वे काही अंतरावर थांबली आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला,” असं चंद्रावतीने सांगितले. रेल्वे थांबताच लोको पायलट आणि प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले आणि त्यांनी चंद्रावतीचे आभार मानले. रुळावरून झाड हटवेपर्यंत रेल्वे घटनास्थळी उभी होती. दुपारी 3.30 च्या सुमारास रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. चंद्रावतीने हृदयाशी संबंधित समस्या असतानाही वयाचा विचार न करता प्रसंगावधान दाखवत हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले. तिच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.